यूपी, आंध्रची कॉपी करा, अन्‌ कर्जमाफी द्या: विखे-पाटील

राजेश कळंबटे
गुरुवार, 18 मे 2017

कोकणी माणूस हा शांत आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी कोकणी माणसाने पाठींबा दिला पाहिजे, असे आवाहन करतानाच विधानसभा, विधानपरिषदेच्या सभागृहात कोकणच्या प्रश्‍नावर आवाज उठवतील असा विश्‍वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.

रत्नागिरी - उत्तरप्रदेशामध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर एक महिन्यात कर्जमाफी दिली जाते. उलट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आम्ही अभ्यास करत आहोत असे उत्तर देतात. आता परीक्षेचा अभ्यास करायची वेळ नाही, कॉपी करून पास व्हायची वेळ आली आहे. तेव्हा उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेशची कॉपी करा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करा, असा सल्ला विरोधी पक्षनेते बाळासाहेब विखे-पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. संघर्ष यात्रेला घाबरून भाजपने संवाद यात्रा, शिवसेनेने शिवसंघर्ष अभियान आणि शेतकरी संघटनांनी आत्मक्‍लेश यात्रांचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.

गणपतीपुळे येथे मुक्‍काम केल्यानंतर संघर्ष यात्रा रत्नागिरीत दाखल झाली. येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. संघर्ष यात्रेचा पहिला टप्पा बांदा येथे पूर्ण होईल; मात्र कर्जमाफी मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे सांगत नांदेड, अहमदनगर आणि गोंदिया येथे भव्य सभा घेणार असल्याचे श्री. विखेपाटील यांनी सांगितले. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार जोगेंद्र कवाडे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सत्ताधारी भाजपसह शिवसेनेवर हल्लाबोल केला. एकीकडे सत्तेत राहायचे आणि दुसरीकडे विरोध करायचा अशी शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे.

त्यांना शेतकऱ्यांचा कळवळा असेल, तर सत्तेतून बाहेर पडा आणि रस्त्यावर उतरा असे आव्हान अजित पवार यांनी केले आहे. तर पृथ्वीराज चव्हाण यांनी तूर डाळीतील भ्रष्टाचार चारशे कोटीहून अधिक आहे. त्याची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे असे आवाहन केले.

कोकणी माणूस हा शांत आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी कोकणी माणसाने पाठींबा दिला पाहिजे, असे आवाहन करतानाच विधानसभा, विधानपरिषदेच्या सभागृहात कोकणच्या प्रश्‍नावर आवाज उठवतील असा विश्‍वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.