इन्सुलीत रस्ता वाद पेटला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

बांदा - इन्सुलीतील वादग्रस्त रस्ता प्रकरण पेटले आहे. अतिक्रमण हटाओच्या नोटिसीवरून ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला घेराओ घातला. जोपर्यंत दिलेली नोटीस आणि खोटी नोंद मागे घेत नाही तोपर्यंत आपण कार्यालय सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा गावकरवाडी ग्रामस्थांनी घेतला. शेवटी ग्रामपंचायतीने माघार घेतल्याने यावर पडदा पडला. सुमारे आठ तास ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या केला. हा प्रकार काल (ता. २०) घडला.

बांदा - इन्सुलीतील वादग्रस्त रस्ता प्रकरण पेटले आहे. अतिक्रमण हटाओच्या नोटिसीवरून ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला घेराओ घातला. जोपर्यंत दिलेली नोटीस आणि खोटी नोंद मागे घेत नाही तोपर्यंत आपण कार्यालय सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा गावकरवाडी ग्रामस्थांनी घेतला. शेवटी ग्रामपंचायतीने माघार घेतल्याने यावर पडदा पडला. सुमारे आठ तास ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या केला. हा प्रकार काल (ता. २०) घडला.

मुलांचे शैक्षणिक नुकसान करून त्यांच्या आड राहून गावात दोन गट निर्माण करून वाद निर्माण केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य महेश धुरी यांच्यावर या जमावाने केला. अखेर ग्रामपंचायत प्रशासनाला नोटीस व रस्ता उतारा निश्‍चित करण्यास ग्रामस्थांनी भाग पाडले. गावकर यांच्या खासगी जागेत झालेले अतिक्रमण उद्या (ता. २२) पर्यंत काढून टाकण्यासंबंधीचे लेखी पत्र सरपंचांनी जमीनमालकांना दिले होते.

गेले चार दिवस एक्‍साईज ऑफिस ते चर्मकारवाडी रस्त्याप्रश्‍नी वाद सुरू आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती. यानंतर काल (ता. २०) या विषयावरून ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामपंचायतीकडे या संबंधीचे पत्र किंवा सातबारा नोंद नाही. तरीही गावकर कुटुंबीयांना रस्त्यापासून सुमारे १२ मीटर अंतरापर्यंत कुंपण घालण्याची नोटीस दिली आहे. याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य धुरी यांनी दोन वाडीत वाद लावून दिला. असा आरोप करून त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलवा आणि त्यांनी निर्माण केलेले वाद त्याला मिटवायला लावा, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.

इन्सुली सरपंच उत्कर्षा हळदणकर, उपसरपंच कृष्णा सावंत, ग्रामविकास अधिकारी सी. व्ही. राऊळ, ग्रामपंचायत सदस्य सदा राणे, प्रभाकर पेडणेकर, तपस्वी मोरजकर, नीता राणे, समीक्षा गांवकर यांना याप्रकरणी जाब विचारला. यावर उपसरपंच सावंत यांनी आम्हाला कोणतीच जाणीव न देता हे पत्रव्यवहाराचे काम सरपंच आणि ग्रामसेवकांनी केलेले आहे.

त्यामुळे तेच सर्वस्वी जबाबदार आहेत असे सांगत ग्रामविकास अधिकारी राऊळ यांना धारेवर धरले. तुम्ही गावात वाद निर्माण करणारे पत्रव्यवहार करत असाल तर लक्षात ठेवा असा इशाराही यावेळी उपसरपंच आणि सदस्यानी दिला.

यावेळी उपस्थित ग्रामस्थ सचिन पालव यांनी जर तुम्ही गावातील एका भूमिपुत्राला अतिक्रमण काढण्याची नोटीस देत असाल आणि बाकी अतिक्रमण असलेल्या सर्वाना पाठिशी घालत असाल आम्ही त्यासाठी तयार आहोत. पण आता गावातील ग्रामपंचायत कार्यालयापासुन अतिक्रमण हटवायला सुरू करू करूया. यात आता सुरू असलेले प्रवेशव्दाराचे काम पहिल्यादा पाडुया नंतर सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि नंतर इतर शेतकऱ्याचे अतिक्रमण तोडुया असे सांगितले. यावर आपण रस्ता संबंधी तक्रार असल्याने नोटीस काढल्याचे यावेळी सरपंचानी सांगितले. यानंतर सरपंचानी ती नोटीस लगेच मागे घेतली.

सुमारे आठ तास चाललेल्या या धडक मोर्चाची दखल घेत गटविकास अधिकारी मोहन भोई, विस्तार अधिकारी धर्णे, पोलीस हेड कॉन्स्टेबल जनार्दन रेवणकर, तंटामुक्त अध्यक्ष उमेश पेडणेकर, पोलीस पाटील जागृती गावडे यांनी या अतिक्रमण केल्याप्रकरणी तोडगा काढण्यासंबंधी चर्चा केली. हा रस्ता अधिकृत कोणत्या मार्गे आहे, हा तुम्हाला माहीत आहे काय असा सवाल यावेळी सरपंचांना रेवणकर यांनी केला. जर कोणतीच संमत्तीपत्र, सातबारा नसेल तर आम्ही ग्रामपंचायत प्रशासन म्हणुन कोणतीच कार्यवाही करू शकत नाही, अशी माहिती यावेळी गटविकास अधिकारी मोहन भोई यांनी दिली. यावर हा रस्ता अडीच किलोमीटर आहे. त्याची मोजणी करण्याचे ठरले. त्याप्रमाणे हा रस्ता १३०० मीटर असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून हा रस्ता नोंदी प्रमाणे नसल्याचे सांगितले. मग जर हा रस्ता नोंदी प्रमाणे नाही तर कोणाच्या वैयक्तीक जागेत अतिक्रमण करण्याचा कोणताच अधिकार ग्रामपंचायतीला नाही, असे विस्तार अधिकारी धर्णे यांनी सांगितले. 

यावेळी तंटामुक्त अध्यक्ष अमेश पेडणेकर यांनी मुलांसाठी किमान रस्ता सोडण्याची विनंती ग्रामस्थांना केली.यावर आपण चार फुट पायवाट सोडणार असल्याचे जमिनमालकांनी मंजुर केले; मात्र ग्रामपंचायत प्रशासनाची चुक असल्याने संपुर्ण गावाला सुमारे आठ तास विनाकारण त्रास सहन करावा लागला अशी नाराजीही ग्रामस्थांनी मांडली.

यावेळी सोसायटी चेअरमन काका चराटकर, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष सचिन पालव, माजी सरपंच बाळू मेस्त्री, विजय गांवकर, मनोहर गावकर, सदानंद कोलगावकर, गजानन गांवकर, मोहन पालव, संतोष मेस्त्री, आनंद चराटकर, राजन मुळीक, सचिन बोर्डेकर, हर्षदा गावकर, दिनेश मुळीक, विशाखा गावकर, सुभाष गावकर, माया गावकर, रसिका मुळीक, मिरा गावकर, सागर मेस्त्री, आपा मेस्त्री, सागर गावकर, अजय गावकर, अशोक गावकर, सुंदर गावकर, नितीन मुळीक, बाबु राऊत, उदय मेस्त्री, सर्वेश मांजरेकर, संदेश पालव, गणपत गावकर, कृष्णा गावकर, विनय गावकर, शुभम गावकर, साईश नाईक, लक्ष्मण चराटकर, बाळा गावकर, अजय गावकर, आशिष गावकर यांच्यासह गावकरवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

शिवसेना शिष्टमंडळाची ग्रामपंचायतीस भेट 
या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, अशोक दळवी, नारायण राणे, नाना पेडणेकर यांनी आंदोलनाची माहिती लागताच ग्रामपंचायत कार्यालयात भेट देत ग्रामविकास अधिकारी राऊळ यांना चांगलेच धारेवर धरले. तुम्ही जनतेचे नोकर आहात. जर तुम्ही कोणतेही काम ग्रामस्थांना त्रास होईल असे कराल तर गाठ आमच्याशी आहे, असा इशारा यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिला. अपुऱ्या कागदपत्रांच्या आधारावर कोणतीही कार्यवाही करू नका, अशी कडक सूचना त्यांनी दिली.