बॅंक खात्याची माहिती फोनवर देणे महागात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

माणगाव - सध्या ऑनलाईन बॅंकिंग व एटीएम डेबिट कार्ड वापरताना हॅकरकडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. माणगाव येथील रहिवासी डॉ. अजय आत्माराम मोरे यांच्या खात्यातून 20 मार्चला याचप्रकारे 95 हजार रुपये काढून घेण्यात आले. 

माणगाव - सध्या ऑनलाईन बॅंकिंग व एटीएम डेबिट कार्ड वापरताना हॅकरकडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. माणगाव येथील रहिवासी डॉ. अजय आत्माराम मोरे यांच्या खात्यातून 20 मार्चला याचप्रकारे 95 हजार रुपये काढून घेण्यात आले. 

डॉ. मोरे नेहमीप्रमाणे दुपारी 2 वाजता जेवायला घरी आले. जेवण झाल्यावर 2.30 वाजता त्यांना एक फोन आला. "आपण एसबीआय बॅंकेच्या माणगाव शाखेचे मॅनेजर बोलत आहोत. तुम्हाला बॅंकेत यायला जमेल का? तुमचे अकाऊंट लॉक झाले आहे. तुम्हाला बॅंकेत यावे लागेल,' असे समोरील व्यक्तीने सांगितले. त्यावर "मी सध्या कामात आहे, आताच येऊ शकत नाही. नंतर केव्हा येऊ?' अशी विचारणा मोरे यांनी केली. हे ऐकून "तुम्ही कामात असाल तर मी विचारतो ती माहिती थोडक्‍यात सांगा,' असे फसवणूक करणाऱ्याने सांगितले. त्या वेळी त्याने मोरे यांना त्यांच्या खात्याबद्दल 90 टक्के माहिती स्वत:हून दिली. ती ऐकून त्याच्यावर मोरे यांचा विश्‍वास बसला आणि त्यांनी त्याला पाहिजे ती माहिती पुरवली. त्यानंतर मोरे यांच्या खात्यातून 95 हजार रुपये काढून घेतल्याचे निदर्शनास आले. वास्तविक पाहता बॅंक खात्याबद्दल किंवा पिन नंबर आदीबद्दल कोणतीही माहिती फोनवरून देऊ नये, असे आवाहन बॅंकांनी केले आले. तरीही अनेक ग्राहक फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. मोरे यांनीही त्यांच्या ऑनलाईन व्यवहाराचा पासवर्ड अनावधानाने फोनवर सांगितला. कामाच्या व्यापामुळे ही बाब त्यांच्या लक्षात आली नाही. 

खात्यातून परस्पर पैसे काढले जाताच डॉ. मोरे यांनी तातडीने बॅंकेत जावून खाते लॉक केले. बॅंकेत रीतसर तक्रार केली. बॅंकेचे अधिकारी-कर्मचारी ग्राहकाची फसवणूक झाल्यावर पुरेसे सहकार्य करीत नाहीत किंवा माहिती देत नाहीत, असा अनुभव मोरे यांना आला. पोलिसांत तक्रार केली असता, अशा सायबर टोळ्यांचा फारसा तपास लागत नाही, त्यांना शोधण्यात पोलिस यंत्रणा कमी पडत आहे, असे त्यांना समजले. मोरे यांनी त्यांच्या पुणे-मुंबईतील मित्रांकडे चौकशी केली असता, अनेक सुशिक्षित लोकांची याप्रकारे फसवणूक होत आहे, असे सांगण्यात आले. 

नोटाबंदी व कॅशलेस व्यवहारांमुळे बरेचसे लोक घाबरून, दचकून असतात. याचाच गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फोन करू शकतात किंवा एखादी व्यक्ती भेटायला पाठवू शकतात. त्यांना आपले खाते, एटीएम, डेबिट कार्ड, ऑनलाईन बॅंकिंगबद्दल कोणतीही माहिती देऊ नये. 
- डॉ. अजय मोरे, माणगाव, फसवणूक झालेले एसबीआयचे खातेदार