बाणकोट खाडीतील जलमार्ग देणार विकासाची नवी दिशा

बाणकोट खाडीतील जलमार्ग देणार विकासाची नवी दिशा

मंडणगड - दुर्लक्षित बाणकोट खाडीला नवसंजीवनी देत केंद्र शासनाच्या भारतीय जल प्राधिकरणाने जलमार्गाच्या विकासासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे तालुक्‍याच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. बाणकोट-बांगमांडला सी-लिंक फेज ब्रीज पर्यटन विकासास पोषक ठरणार असून बाणकोटपासून उमरोलीपर्यंतच्या परिसरात जलपर्यटनाच्या संधी निर्माण होणार आहेत.

महाबळेश्वर येथून उगम पावलेली सावित्री नदी बाणकोट येथे अरबी समुद्राला मिळते. दोनशे कि.मी.चा पल्ला असून तालुक्‍याला सुमारे ५० कि.मी.चा किनारा लाभला आहे. या अंतरात म्हाप्रळ रेती बंदर व ब्रिटिशकालीन बाणकोट या दोन मोठ्या बंदरासह पडवे, उंबरशेत, पंदेरी, निगडी, गोठे, उमरोली, शिपोळे, वेसवी या लहान गावांचा समावेश होतो. साठच्या दशकात वेसवीपासून आंबतमार्गे मुंबई अशी जलवाहतूक होती. त्यानंतर रस्ते झाल्याने ही वाहतूक बंद झाली आणि बंदरेही नष्ट झाली. केंद्र शासनाने जल वाहतुकीतून विकासाचा विचार केला आहे. भारतीय देशांतर्गत जलप्राधिकरणाच्या माध्यमातून यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. प्राधिकरणाने त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. जलवाहतुकीबरोबरच धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या निर्मितीबरोबर नवीन जेटींची उभारणी व जुन्या जेटीचे नूतनीकरण होण्याची अपेक्षा आहे. रस्ते व रेल्वे वाहतुकीवरील वाढता ताण कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून जलमार्गाना प्राधान्य देण्याचे सुचित केल्याने जलमार्गाचा विकास करण्याचे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. देशातील १०६ राष्ट्रीय जलमार्ग विकसित करण्याची योजना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केली आहे. त्यामध्ये कोकणातील, दाभोळखाडी ते वाशिष्ठी, रेवदंडा खाडी ते कुंडलिका व सावित्री नदी-बाणकोट खाडीचा समावेश आहे. त्याचबरोबर सागरी महामार्ग जोड अभियानाच्या माध्यमातून साकारत असलेला बाणकोट बांगमांडला सी-लिंक फेज ब्रीज पर्यटन विकासास पोषक ठरणार आहे. बाणकोटपासून उमरोलीपर्यंतच्या परिसरात जलपर्यटनाच्या खूप संधी त्यामुळे निर्माण होणार आहेत. या सी लिंकमुळे मंडणगड-श्रीवर्धन तालुके जोडले जाणार आहेत. २०१४ ला या पुलाचे काम सुरू झाले असून २०१८ पर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. 

आंबडवे, निगडी ते हरेश्वर असा जलमार्ग निर्माण झाल्यास त्याचा फायदा पर्यटकांना होणार आहे. त्यांचा वेळ वाचणार आहे. तसा प्रयत्न आंबडवे सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत विचाराधीन आहे. त्यामुळे आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेला मात्र निसर्गसंपदेने नटलेला हा परिसर नावारूपाला येण्यास मदत होईल.
- विजय ऐणेकर, स्थानिक रहिवासी, घुमरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com