बायोमेट्रिक मशीन जबरदस्तीने बसविल्यास कचरा कुंडीत फेकू - नीतेश राणे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

वैभववाडी -  ग्राहक आणि दुकानदारांना विश्‍वासात घेतल्याशिवाय रास्त धान्य दुकानांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसवू नये. जबरदस्तीने बसविल्यास त्या कचराकुंडीत फेकू, असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी सभेत दिला. 

येथील तालुका दक्षता समितीची सभा आमदार राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी तहसीलदार संतोष जाधव, गटविकास अधिकारी श्रीराम शिरसाट, सदस्य सदानंद रावराणे, श्रीराम शिंगरे, अनंत फोंडके, सुविधा रावराणे, वैशाली सावंत आदी उपस्थित होते. 

वैभववाडी -  ग्राहक आणि दुकानदारांना विश्‍वासात घेतल्याशिवाय रास्त धान्य दुकानांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसवू नये. जबरदस्तीने बसविल्यास त्या कचराकुंडीत फेकू, असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी सभेत दिला. 

येथील तालुका दक्षता समितीची सभा आमदार राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी तहसीलदार संतोष जाधव, गटविकास अधिकारी श्रीराम शिरसाट, सदस्य सदानंद रावराणे, श्रीराम शिंगरे, अनंत फोंडके, सुविधा रावराणे, वैशाली सावंत आदी उपस्थित होते. 

रास्त दुकानामध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसविण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले. या वेळी सर्व सदस्यांनी या प्रणालीला विरोध केला. आमदार श्री. राणे यांनीदेखील बदल ही काळाची गरज आहे; परंतु या प्रणालीला आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून द्या. या प्रणालीला रास्त धान्य दुकानदार संघटनेने विरोध केला आहे. चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी केल्यामुळे ग्राहकांची गैरसोय होते. त्यामुळे जोपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत ही प्रणाली जिल्ह्यात बसवू नये. दुकानदार आणि ग्राहक यांना विश्‍वासात घेऊनच बायोमेट्रिक मशीन बसविण्यात याव्यात. जर जबरदस्तीने बसविण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्या कचराकुंडीत फेकून देऊ, असा इशारा आमदार राणे यांनी प्रशासनाला दिला. ही प्रणाली तालुक्‍यातील एकाही धान्य दुकानात बसवू नये, असा ठराव आजच्या सभेत सर्वानुमते घेण्यात आला. अधिकाऱ्यांनी या प्रणालीतील दोष आपल्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्यावेत, अशी सूचनादेखील त्यांनी केली. 

उज्ज्वला गॅस योजनेच्या सदोष यादीबाबत काय निर्णय झाला, अशी विचारणा आमदार राणे यांनी तहसीलदारांकडे केली असता, तहसीलदार श्री. जाधव यांनी ही योजना केंद्र शासनाची आहे. या याद्यांसंदर्भात तेल कंपन्यांशी संपर्क साधण्याची सूचना करण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण केले. या वेळी राणे यांनी कंपनीच्या प्रतिनिधीसोबत सभेचे आयोजन करा, अशी सूचना केली. उज्ज्वला गॅस योजनेबाबत लोकांच्या खूप तक्रारी आहेत. जर त्या सुटल्या नाहीत तर आम्हाला कंपनीविरुद्ध आवाज उठवावा लागेल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. 

गोदाम इमारत दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मंजूर होताच दुरुस्त करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार श्री. जाधव यांनी सभेत दिली. गोदामाच्या बाहेर खासगी वाहने उभी केल्यामुळे धान्य वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडचण होते. त्यामुळे गोदामाबाहेर खासगी वाहने उभी करण्यास मज्जाव करावा, अशी सूचना तहसीलदार श्री. जाधव यांनी केली. दक्षता समितीत नवीन सदस्य घेण्याबाबत काही निर्णय झाला का, असा प्रश्‍न आमदार राणे यांनी तहसीलदारांना विचारला असता जाधव यांनी अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगितले. 

समस्यांविषयी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार 
तालुकास्तरावर असलेल्या समस्यांविषयी जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेण्याचा निर्णय आजच्या सभेत घेण्यात आला. अंत्योदय लाभार्थ्यांपैकी एखाद्या सदस्याने स्वतंत्र शिधापत्रिका काढल्यास त्याला अंत्योदयचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी सदस्यांनी केली. याबाबत पुरवठा विभागाने तशा प्रकारचा शासन निर्णय असल्याचा खुलासा केला. या वेळी राणेंनी शासन निर्णय द्या आपण वरिष्ठ पातळीवर तो विषय मांडू, असे स्पष्ट केले.