चिपळूण पोलिस ठाण्यांत बायोमेट्रीक हजेरी सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आली आहे. चिपळूणसह शिरगाव आणि सावर्डे पोलिस ठाण्यात ही यंत्रे बसवण्यात आली आहेत. त्यामुळे लेटलतीफ आणि सेवेवर असल्याचे दाखवून खासगी कामे करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे.

चिपळूण - पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आली आहे. चिपळूणसह शिरगाव आणि सावर्डे पोलिस ठाण्यात ही यंत्रे बसवण्यात आली आहेत. त्यामुळे लेटलतीफ आणि सेवेवर असल्याचे दाखवून खासगी कामे करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे. अशाच कर्मचाऱ्यांवर कारवाई करता यावी यासाठी पोलिस खात्यातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.

बायोमेट्रिक हजेरीमुळे किती पोलिस कर्मचारी किती तास काम करतात हे स्पष्ट होणार आहे. अपघात झाला, कोणती दुर्घटना घडली की पोलिसांना धावावे लागते. पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातील चार दिवस गस्त घालावी लागते. त्यामुळे दिवसा काम केल्यानंतर रात्री पुन्हा ड्युटी, दुसऱ्या दिवशी सकाळी बायोमेट्रिक हजेरी लावण्यासाठी पुन्हा वेळेवर कामावर हजर व्हावे लागणार आहे. पोलिस कर्मचाऱ्यांवर दिवसातून दोन वेळा हजेरीचे बंधन घातले जाणार आहे. एखादी घटना घडल्यानंतर पोलिस कर्मचारी पोलिस ठाण्यात न येता घटनास्थळी पोचला आणि नंतर पोलिस ठाण्यात येऊन त्याने बायोमेट्रीक पद्धतीने हजेरी लावली तरी चालणार आहे; मात्र उशिरा हजेरी लावण्याचे कारण देण्यासाठी रजिस्टर ठेवले जाणार आहे. उशिरा हजेरी लावल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याची कारणेही या रजिस्टरमध्ये लिहावी लागणार आहेत. त्याची तपासणी ठाण्याचे प्रमुख तपासणार आहेत. नियमित काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी हे अवघड नाही; मात्र कामावर असल्याचे दाखवून खासगी काम करणारे कर्मचारी तसेच लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर मात्र बायोमेट्रीक हजेरी पद्धतीमुळे अंकुश येणार आहे.