वाढदिवसाची रक्कम दिली निराधार कुटुंबांना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

चिपळूण - खेर्डीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य दशरथ दाभोळकर यांचा वाढदिवस दशरथ दाभोळकर मित्र मंडळाने अनोख्या पद्धतीने साजरा केला. वाढदिवसातील झगमगाट कार्यक्रम व बॅनरबाजी टाळून वाढदिवसासाठीची रक्कम निराधार महिला कुटुंबांना दिली. १० कुटुंबांना प्रत्येकी अडीच हजार आणि साडी भेट देत समाजात वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला.

खेर्डीतील दशरथ दाभोळकर मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वखुशीने जमा केलेला वाढदिवस निधी निराधार कुटुंबाच्या मदतीसाठी दिला. दशरथ दाभोळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काल खेर्डी जिल्हा परिषद गटातील १० निराधार कुटुंबांना आर्थिक मदत करीत त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सानिका सचिन लांबे, मयूरी मनोज शिगवण (खेर्डी-शिगवणवाडी), सुनंदा शामराव पवार (बाजारपेठ खेर्डी), कविता चिदानंद नाईक  (खेर्डी-वरचीपेठ), मनाली मंगेश भिंगारे (विकासवाडी), सुरेखा सुनील सावंत (धामणवणे बौद्धवाडी), मेघना संजय शिंदे (कापसाळ), समिधा सुमेध माटे (कामथे) यांना मदत केली. टेरव-सुतारवाडीतील जयराम गंगाराम वासकर यांच्या घरास लागलेल्या आगीने संपूर्ण साहित्य जळून खाक झाले होते. या कुटुंबासही मंडळाने संसारोपयोगी भांडी आणि अडीच हजाराची मदत करीत त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न केला. संबंधित कुटुबांच्या घरी जाऊन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली. त्यानंतर सायंकाळी सर्व पक्षीय कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी दशरथ दाभोळकर यांना त्यांच्या निवासस्थान समोरील आयोजित छोटेखानी कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या. 

गतवर्षी या मंडळाने वाढदिवासाची २१ हजाराची रक्कम नदीतील गाळ काढण्यासाठी खेर्डी ग्रामपंचायतीस दिली होती. यावेळीही बॅनर व इतर कार्यक्रमावरील खर्च टाळून तो समाज हितासाठी खर्च केला. कार्यक्रमास राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, सरपंच जयश्री खताते, सर्व सदस्य मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी, खेर्डी जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते उपस्थित होते.