संगमेश्‍वरमधील भाजपच्या मताचा टक्का वाढला

संगमेश्‍वरमधील भाजपच्या मताचा टक्का वाढला

देवरूख - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत संगमेश्‍वर तालुक्‍यात शिवसेनाच नंबर एकवर असली, तरी विधानसभा आणि मागील पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या तुलनेत भाजपने मिळवलेली मतांची संख्या लक्षणीय ठरली. तालुक्‍यात सर्वच ठिकाणी भाजप नंबर दोनवर राहिला.

भाजपचा वाढलेला टक्‍का आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसाठी धोक्‍याची घंटा ठरणारा असल्याचे मत राजकीय विश्‍लेषक व्यक्‍त करीत आहेत. 

काल जाहीर झालेल्या निकालानंतर संगमेश्‍वर तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या सातही जागांवर, तर पंचायत समितीच्या १४ पैकी १३ जागांवर भाजपला पराभव पत्करावा लागला. भाजपचा सुपडासाफ अशा चर्चा सुरू असल्या, तरी प्रत्यक्षात आकडेवारी पाहिल्यास भाजपने मारलेली मुसंडी आगामी काळात शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.

तालुक्‍यात जिल्हा परिषदेसाठी १ लाख ४७ हजार २५४ पैकी ९० हजार ९४३ मतदारांनी हक्‍क बजावला. यामधून शिवसेनेने ४४ हजार १४४, भाजपने २९ हजार ९७४, तर काँग्रेस आघाडीने १७ हजार ३८५ मते मिळवली आहेत. यात शिवसेनेच्या मतात दोन टक्‍क्‍यांनी वाढ झाली असली तरी भाजपच्या मतात ४० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. आघाडीने आपली बेरीज कशीबशी टिकवून ठेवली आहे.

पंचायत समितीसाठीही तालुक्‍यात ९० हजार ९४३ मतदान झाले होते. यामधून शिवसेनेने ४३ हजार ७५१, भाजपने २२ हजार ०८१, आघाडीने १७ हजार ७१८ मते मिळवली आहेत. इथेही भाजपची मते लक्षणीय वाढली असून गतवेळची १ असलेली सदस्यसंख्या यावेळीही कायम राहिली आहे. 

साडेतीन वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत संगमेश्‍वर तालुक्‍यात भाजपला ५ हजाराच्या आसपास मते मिळाली होती. तर २०१२ च्या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी हाच आकडा १० हजारच्या घरात होता. 

या निवडणुकीतील भाजपची आकडेवारी पाहता सेनेच्या तुलनेत भाजपने जबरदस्त मुसंडी मारल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे देवरूख नगरपंचायत असल्याने भाजपच्या हक्‍काचे असलेले देवरूखातील मतदान यात धरलेले नाही. विधानसभेच्या बेरजेत देवरुखातील १० हजार मते अधिक होणार आहेत. यामुळे तालुक्‍यात भाजपची बेरीज ३५ हजारच्या पुढे जाणार आहे. विधानसभेसाठी ही मते निर्णायक ठरतील यात शंकाच नाही. 

आघाडीचे केवळ अस्तित्व शिल्लक
काँग्रेस-राष्ट्रवादीचा विचार करता येथे आघाडीने आपले अस्तित्व मतांच्या रूपाने का होईना, पण टिकवून ठेवले आहे; मात्र करिष्मा करण्याची कोणतीच ताकद आघाडीत शिल्लक नसल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपचा वाढलेला टक्‍का हा सेनेसाठी आगामी काळात धोक्‍याची घंटा समजली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com