स्वबळावर लढण्यासाठी भाजपची रणनीती तयार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 ऑक्टोबर 2016

रत्नागिरी - भाजपने जिल्ह्यात स्वबळावर लढण्याची संपूर्ण तयारी केली आहे. त्याची "रणनीती' कशी असावी, याबाबत आज जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. अन्य पक्षांतूनही गुणवत्तापूर्ण व सक्षम कार्यकर्त्यांना सामावून घेण्यात येणार आहे. भाजप जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष होण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. दापोली, खेड, राजापूरसह रत्नागिरीमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत मिळवू. रत्नागिरीच्या भाजप नगराध्यक्षांचा सत्कार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना बोलावू, असा विश्‍वास जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी आज येथे व्यक्त केला.

शिर्के प्रशालेत भाजपची जिल्हा कार्यकारिणीची सभा झाली. संघटनमंत्री सतीश धोंड, चिटणीस डॉ. विनय नातू, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष नीलम गोंधळी, प्रा. नाना शिंदे, सतीश शेवडे, प्रशांत शिरगावकर, अमजद बोरकर, सोनुभाऊ कळंबटे यांच्यासह नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, दत्ता देसाई, अशोक मयेकर, केदार साठे व तालुकाध्यक्ष, सरचिटणीस कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. माने यांनी सांगितले, की आज अनेक कार्यकर्ते स्वाभिमानाने उमेदवारी मागायला येत आहेत. यावरूनच भाजपकडे युवकांचा ओढा वाढत असून, जिल्ह्यात बदल घडतोय. भाजपचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना "विजयाची गुरुदक्षिणा' देण्यासाठी प्रयत्न आहे. निवडणुकीसाठी व्यूहरचना सुरू आहे. मुस्लिम, आदिवासी, कातकरी आदी अनेक जाती-धर्माचे लोक भाजपकडे आकृष्ट होत आहेत.

या वेळी लांज्याचे कुणबी सेनेचे अध्यक्ष सीताराम सांडम यांच्यासह मोठ्या संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्षपद दिले आहे. लांजा नगरपंचायतीचे अपक्ष नगरसेवक रवींद्र कांबळे हेसुद्धा भाजपवासी झाले. कांबळे यांना लवकरच उपाध्यक्षपद देण्यात येईल, असे श्री. माने यांनी सांगितले. 1992 मध्ये श्‍यामराव पेजे यांनी दिलेला कुणबी समाजाचा अहवाल लागू करण्याची मागणी सांडम यांनी केली. पेजे कुणबी आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती व मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेला निधी मिळावा, अशा मागण्याही त्यांनी केल्या. या सर्व मागण्या नक्कीच पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे नक्की पाठपुरावा करू, असे आश्‍वासन माने यांनी दिले.

Web Title: BJP on its own to create a strategy for political fight