‘नाणार’वरून भाजप - सेनेत जुंपली

‘नाणार’वरून भाजप - सेनेत जुंपली

सिंधुदुर्गनगरी - नाणार प्रकल्पाच्या मुद्यावरून शिवसेना आणि भाजप सदस्यांमध्ये आज जिल्हा नियोजन सभेत जुगलबंदी रंगली. खासदार नारायण राणे यांनी या वादावर पडदा टाकला. बिघडलेली आरोग्य व्यवस्था, खंडित वीजपुरवठा आणि रखडलेले कृषी पंप, कोलमडलेली बीएसएनएलची सेवा यावरून सदस्य आक्रमक झाले; तर विविध मुद्यांवर पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सदस्यांनी केला; मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही.

जिल्हा नियोजनची सभा नियोजन मंडळाच्या सभागृहात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला खासदार नारायण राणे, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे, आमदार निरंजन डावखरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्‍मा सावंत, जिल्हधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, नियोजन अधिकारी ममता हटकर आदी उपस्थित होते.

नियोजन सभेच्या सुरवातीला महाराष्ट्र स्वाभिमानच्या सदस्यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांना घेरण्याचा प्रयत्न केला. पूर्वीच्या सभेतील मुद्यांची दखल न घेणे, सभेचे शूटिंग न होणे, पर्यटनाचा निधी मागे जाणे; तसेच पालकमंत्र्यांनी सदस्यांच्या निलंबनाबाबत केलेले वक्तव्य आदी मुद्यांवरून खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणेंसह सतीश सावंत व इतर सदस्यांनी पालकमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रत्येक मुद्दा श्री. केसरकर यांनी मुद्देसूदपणे खोडून काढला. त्यानंतर विविध स्थानिक मुद्यांवर सदस्य प्रश्‍न उपस्थित करीत राहिल्याने दुपारी तीन वाजता सुरू झालेली सभा सायंकाळी साडेसातपर्यंत सुरू होती. तब्बल साडेआठ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज नियोजनची सभा झाली. ही सभा वादळी ठरण्याची शक्‍यता होती. 
नियोजन मंडळ बैठकीत सदस्यांनी नियमभंग केल्यास निलंबन करण्याचे वक्तव्य पालकमंत्री श्री. केसरकर यांनी केले होते; मात्र तसा अध्यादेश आहे का, असा प्रश्‍न नारायण राणे यांनी उपस्थित केला. तर ‘आम्ही विकासकामांवर प्रश्‍न मांडतो. त्यासाठी निलंबन करण्याचा अधिकार पालकमंत्र्यांना नाही,’ असे सतीश सावंत व इतर सदस्यांनी सुनावले. या मुद्यावर वातावरण तापले होते; परंतु श्री. केसरकर यांनी याबाबतच्या नियमात झालेली सुधारणा वाचून दाखवली. निलंबनाची शिफारस राज्य सरकारकडे करता येईल असे वक्तव्य आपण केल्याचे श्री. केसरकर म्हणाले. त्यानंतर या वादावर पडदा पडला.

नाणार रिफायनरी प्रकल्पावरून सभेत शिवसेना, भाजप आणि स्वाभिमानच्या सदस्यांमध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली. मागील सभेत नाणार प्रकल्प होऊ नये असा ठराव घेतला होता. त्या सभेचा धागा पकडून खासदार श्री. राऊत यांनी ‘नाणार प्रकल्पाबाबत सरकार विरोधाचा नव्हे, तर सभागृहाच्या भावना सरकारपर्यंत पोचविण्याचा ठराव करा,’ असा मुद्दा मांडला. राणे समर्थक सतीश सावंत, रणजित देसाई आणि आमदार नितेश राणे यांनीही नाणार होऊ नये, अशी भूमिका घेतली. तर भाजपचे काळसेकर यांनी नाणार झाला पाहीजे अशी भूमिका शिवसेनेची होती याची आठवण करून दिली. त्यावर खासदार राऊत आणि श्री. काळसेकर यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. यात पालकमंत्री केसरकर यांनी हस्तक्षेप केला आणि नाणार प्रकल्पाला विरोध असा ठराव घेण्यात येत आहे असे सांगितले. त्यावर काळसेकर संतापले. ‘तुम्ही भाजपमुळेच मंत्री झालात,’ असे खडेबोल सुनावले. यावर नारायण राणे यांनी हस्तक्षेप करीत श्री. केसरकर हे सभाध्यक्ष असल्याने ते सभागृहाचे मत, भावना मांडत आहेत. हे केसरकरांचे मत नव्हे, असे सांगून वादावर पडदा टाकला.

पर्यटन निधी परत जात असल्याच्या मुद्यांवरदेखील सदस्य आक्रमक झाले. या मुद्यांवर चर्चा करताना कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे जुने घर नव्याने करण्याचा प्रस्ताव असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. बीएसएनएलचा फटका ‘स्वच्छ भारत’ला बसल्याचा आरोप जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केला. पहिल्या क्रमांकावरून बाराव्या क्रमांकावर जिल्हा गेला अशीही खंत त्यांनी मांडली. 

आरोग्य प्रश्‍नावर ‘तू-तू, मैं-मैं’
आरोग्याच्या प्रश्‍नावर आमदार नितेश राणे यांनी जिल्हा शल्य-चिकित्सकांवर प्रश्‍नांचा भडिमार केला. तेव्हा खासदार श्री. राऊत यांनी आरोग्याच्या प्रश्‍नावर पालकमंत्र्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला, तर भाजपचे सदस्य अतुल काळसेकर यांनी आरोग्याबाबत खोटी माहिती दिली जात आहे असे स्पष्ट केले. त्याला राणे समर्थकांनी दुजोरा दिला.

सभेच्या रेकॉर्डिंगवरून शाब्दिक चकमक
सभेचे रेकॉर्डिंग होत नसल्याच्या मुद्यावरून आमदार वैभव नाईक, सतीश सावंत, रणजित देसाई, दादा कुबल, शिवसेनेचे संजय पडते यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. बीएसएनएलच्या टॉवर उद्‌घाटन मुद्यांवरून श्री. राऊत आणि आमदार नितेश राणे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. बांदा येथे क्रीडांगण होण्याबाबत अतुल काळसेकर आणि श्री. केसरकर यांच्यातही बराच वेळ वाद रंगला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com