भाजपचे चिंतन ठरले चिंता वाढवणारेच

भाजपचे चिंतन ठरले चिंता वाढवणारेच

गुहागर - गुहागरमध्ये भाजपच्या चिंतन बैठकीत वादावादी झाली. बैठकीवर बहिष्कार टाकून कार्यकर्ते निघून गेले. या साऱ्या घटनांमुळे भाजपचे चिंतन चिंता वाढविणारेच ठरले. निवडणुकांनंतर जिल्हाध्यक्ष बाळ माने यांना हटविण्याची मोहीम भाजप अंतर्गतच सुरू झाली. माधव गवळी त्यात आघाडीवर होते. गुहागर तालुक्‍याचे मानेंना समर्थन आहे, असा मतप्रवाह असतानाच चिंतन बैठकीत मानेंना उघड विरोध झाला. चिंतन बैठकीतून निघून जाताना कार्यकर्त्यांनी यापुढे जिल्हाध्यक्ष बैठकीला नकोतच, अशी भूमिका घेतल्याने माने यांच्या पुढील वाटचालीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चिंतनातून परीक्षण होण्याऐवजी भाजपच्या चिंता वाढल्या आहेत. 

२००९ ला विनय नातू अपक्ष म्हणून विधानसभा लढले. तेव्हापासून गुहागर तालुक्‍यातील भाजपची सद्दी संपली. दर निवडणुकीनंतर पराभवाचे पोस्टमार्टेम होते. पुढील निवडणुकीत विजय नक्की असा आशावाद कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला जातो. पुन्हा अपयशाचे पहिले पाढे पंचावन्न. यातून कार्यकर्त्यांना वैफल्य आले आहे.  या वेळी केंद्र व राज्यातील भाजपच्या सत्तेचे टॉनिक असल्याने गुहागरात भाजप बाळसे धरण्याचा विश्वास होता; मात्र हा फुगा फुटला.  ढोरमेहनत करूनही अपेक्षित जागीही यश मिळाले नाही. यातून निर्माण झालेला उद्रेक चिंतन बैठकीत बाहेर पडला.  

गुहागरमध्ये आमदार राष्ट्रवादीचे, केंद्रीय मंत्री व पालकमंत्री शिवसेनेचे. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना छोटी मोठी कामे करतात. भास्कर जाधव, अनंत गीते गावागावात उद्‌घाटने, भूमिपूजनांना हजेरी लावतात. येथील शिवसैनिक पालकमंत्र्यासोबत मंत्रालयात जातात. कामे करून घेतात. भाजपच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाचे मंत्रीच दर्शनदुर्लभ आहेत. त्यांचा दौरा, उद्‌घाटने, भूमिपूजने ही दूरची बाब. सत्तेचा थेट फायदा भाजप कार्यकर्त्यांना मिळत नाही. घोषणा कितीही झाल्या तरी वाड्यावस्त्यांवरील भाजपच्या कार्यकर्त्याला पाखाडी, वाडीरस्ताही मिळत नाही. हे स्थानिक कार्यकर्त्यांचे दु:ख आहे.

मंत्री व नेते गुहागरकडे दुर्लक्ष करतात,  मेहनत करूनही सदा अपयश यामुळे आलेली निराशा जिल्हाध्यक्षांपर्यंत पोचवण्यास कार्यकर्ते आतूर होते. याआधी नातू, शिरगावकर, भालेकर ही मंडळी कार्यकर्त्यांना बोलू द्यायची. त्यांची मते ऐकून घ्यायची. त्यावर एकत्रित विचार व्हायचा. हे अंगवळणी पडलेल्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी ते मध्येच तोडून मानेंनी प्रश्न विचारले. बैठकीत मानेंनी लावलेला चेष्टेचा सूर कार्यकर्त्यांना रुचला नाही. त्यातून ठिणगी पडली.  शब्दाला शब्द वाढला आणि कार्यकर्ते सभागृहातून बाहेर पडले. यामुळे चिंतन बाजूला राहून पक्षाची चिंता वाढली. 

बाळ मानेंची शैली वेगळी आहे. गुहागरातील कार्यकर्त्यांप्रमाणे अपयश त्यांनीही सोसले आहे. चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांचा उद्रेक सातत्याने अपयश आल्याने नैराश्‍यातून घडला. यातून चुकीचे निर्ष्कष काढले जात आहेत. पक्षात कार्यकर्त्यांचा सन्मानच होतो. येथील भाजप पुन्हा गतवैभव प्राप्त करेपर्यंत एकत्र संघर्ष करू.
- विठ्ठल भालेकर, भाजप गुहागर तालुकाध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com