'भाजपची ताकद वाढवणार'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

लवकरच प्रवेशाची रीघ
जिल्ह्यात भाजप पक्ष बळकट करण्यासाठी आपली मदत राहील. येत्या काही दिवसांत होणाऱ्या भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीवेळी जिल्हाभरातील विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा विश्‍वास अतुल रावराणे यांनी व्यक्‍त केला.

देवगड - आपल्या मनातील जिल्हा विकासाच्या विविध संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी सत्तेत असलेल्या भाजपमध्ये आपण प्रवेश केला. जिल्ह्यात भाजप पक्ष बळकट करून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपची ताकद वाढवणार, असा विश्‍वास अतुल रावराणे यांनी जामसंडे येथील पत्रकार परिषदेत व्यक्‍त केला.

श्री. रावराणे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर प्रथमच तालुका दौऱ्यावर आले असता जामसंडे येथील पक्ष कार्यालयात फटाके वाजवून त्यांचे जल्लोषी स्वागत झाले. त्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार ॲड. अजित गोगटे, जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, प्रमोद रावराणे, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे, राजू तावडे आदी उपस्थित होते. ॲड. अजित गोगटे यांनी रावराणे यांचे देऊन स्वागत केले. 

श्री. रावराणे म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीत पक्षवाढीचे काम स्थानिक नेतृत्वामुळे करता आले नाही. आपल्या काही विकासाच्या कल्पना आहेत. त्या राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपच्या नेत्यांकडे मांडल्या. त्यांच्या कामाची पद्धत आपल्याला भावली. आपल्या जिल्हा विकासाच्या कल्पना सत्यात उतरवण्यासाठी सत्तेत असलेल्या भाजपच्या माध्यमातून त्या पूर्णत्वास नेता येतील, असा विश्‍वास आहे. येथे पर्यटनातून स्थानिक विकास करण्यास मोठा वाव आहे. लगतच्या गोवा राज्याची झालेली प्रगती पाहता, सिंधुदुर्गात निसर्गसौंदर्य पाहता येथे विकास शक्‍य आहे. पर्यटनातून विकास झाल्यास स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. निवडणुकीमधील युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ घेतील. मात्र शंभर टक्‍के सत्ता आणण्यासाठी आपले प्रयत्न राहतील.’’

Web Title: BJP's strength going