वधूशोधासाठी वरपिते झिजवताहेत चपला...

वधूशोधासाठी वरपिते झिजवताहेत चपला...

सावर्डे - ‘तो कानाला मोबाईल लावलेला मुलगा आहे ना, तो माझा मुलगा आहे. त्याला एखादी मुलगी बघा. अजून  किती दिवस त्याला मुली पाहावयास लागतात देव जाणे. स्थळे पाहून पाहून आता तो थकला आहे...’ हा संवाद आहे नुकत्याच एका ग्रामीण भागातील लग्नमंडपात नवरदेवाची वाट बघत ताटकळत बसलेल्या वऱ्हाडी मंडळीमधला.

सध्या सर्वत्र लग्नसराईची धूम सुरू आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून असलेले तरुण प्रत्येक लग्नात हजेरी लावून आपल्यालाही ‘यंदा कर्तव्य’ असल्याचे दाखवून देत आहेत. यापूर्वी वधूपित्याला वरपक्षाचे उंबरे झिजवावे लागत, मात्र गेल्या काही वर्षांपासून ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.

मुलांची वाढलेली संख्या आणि त्यांचे बेरोजगारांचे वाढते प्रमाण वधूपित्यांना सावध करतात. त्यामुळे वरपक्षाच्या चिंतेत भर पडते. मुली सर्वच क्षेत्रांत अग्रेसर आहेत. मुलांच्या तुलनेत अनेक यशाची शिखरे पादाक्रांत करीत आहेत. मुलाचा हट्ट धरणारे आज त्याच मुलाच्या लग्नाच्या चिंतेत आहेत. हा बदल घडवून आणायला त्यांचाच हातभार लागला आहे. मुलगाच पाहिजे या हट्टापायी अनेक मुलींच्या कळ्या उमलण्यापूर्वीच खुडल्या जातात. मुलांच्या तुलनेतील मुलींचा जन्मदर समाधानकारक नाही. दिवसेंदिवस मुलींची संख्या घटतच आहे.

अगदी गेल्या महिन्यातील नवीन जन्म झालेल्या मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत अजूनही कमीच असल्याची खेदजनक बाब समोर आली आहे. एक हजार पुरुषामागे ९५१ मुलींचे प्रमाण आहे. दिवसेंदिवस आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांसह विविध क्षेत्रांतील प्रबोधनकार मंडळी घसा ताणून ओरडून मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याचा आग्रह धरीत असले तरी मुलाचा हट्ट धरणारे हटवादी काही ऐकायला तयार नाहीत. यातून सामाजिक असमतोल तयार झाला आहे. मुली शिकल्या, वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतंत्रपणे उभ्या राहिल्या. मुलांइतकीच किंवा त्यापेक्षा अधिक कमाई करू लागल्या.

कर्तृत्व गाजवू लागल्या. यामुळे तोलामोलाचा साथीदार त्यांना अपेक्षित असतो. परिणामी खेड्यात राहणारा आणि कमी शिकलेला मुलगा लग्नाच्या बाजारात दुर्लक्षित आहे. यातून आणखी एका प्रकारचा असमतोल समाजात तयार होतो आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका विवाह सोहळ्यादरम्यानचा वर उद्‌धृत केलेला प्रसंग मुलाचा हट्ट धरणाऱ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे. फक्त कमावणाराच नाही तर चांगला भरपूर पगारदार मुलगाच पाहिजे याबाबत आता मुली आग्रही आहेत, तर लग्नाला विलंब झालेले फक्त मुलीची अपेक्षा करीत आहेत.

जन्मदरात जिल्ह्याची स्थिती राज्यात चांगली असली, तरी गेल्या वीस वर्षांत लिंग चाचणीचा कायदा इतका कडक नव्हता जो आता आहे तसा. त्यामुळे मुले-मुलींच्या जन्मदरात असमतोल होता. तो समान असायला हवा. 
- डॉ. अनिल परदेशी, प्राथमिक आरोग्य केंद्र, खरवते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com