मृतदेह दफन प्रकरण चिघळण्याची चिन्हे 

मृतदेह दफन प्रकरण चिघळण्याची चिन्हे 

सावंतवाडी - भरवस्तीत दफन केलेल्या मृतदेहावरून पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून झालेला शिष्टाईचा प्रयत्न निष्फळ ठरला. काही झाले तरी प्रशासनाने तो मृतदेह बाहेर काढावा, अशा मागणीवर रहिवासी ठाम आहेत. या प्रश्‍नावर एकमत न झाल्यास ही न्यायालयीन बाब होणार आहे. यामुळे पुढे कोणता निर्णय घ्यायचा याबाबत तुम्हीच निर्णय घ्या, असे सांगून पालकमंत्री केसरकर यांनी रात्री बारा वाजता बैठक आटोपती घेतली. त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्‍यता वाढली आहे. 

शहरातील श्रमविहार कॉलनीत दफन केलेला मृतदेह काढवा, या मागणीसाठी तेथील रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बिशप आल्विन बरेटो यांच्या उपस्थितीत मंगळवार (ता. 18) रात्री उशिरा बैठक घेतली. या बैठकीत संबंधित मृतदेह दफन केलेल्या ठिकाणी फरशा घालणार. तीन वर्षांनी त्या ठिकाणी असलेल्या अस्थी काढणार आणि ती जागा यानंतर कधीही दफनभूमी म्हणून वापरण्यात येणार नाही, असा तोडगा ख्रिश्‍चन समाजाचे बिशप बरेटो यांच्याकडून मांडला. 

यानंतर पालिका सभागृहात पुन्हा बैठक घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत श्री. केसरकर यांनी उपस्थित रहीवाशांची भूमिका ऐकून घेतली. यात काही झाले तरी आम्ही गप्प बसणार नाही. त्या ठिकाणावरून मृतदेह काढलाच पाहिजे, तसेच हा प्रकार करून शांतता बिघडविण्याचे काम करणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. हा प्रकार पालिकेच्या कार्यक्षेत्रात घडला आहे. तो चुकीचा आहे, असे प्रशासनासोबत ख्रिश्‍चन धर्मगुरुंचेही मत आहे. यामुळे संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली. या वेळी अनंत ओटवणेकर, निखिल पाटील, महेश पाटील, यशवंत केसरकर आदींनी आपल्या भूमिका मांडल्या. 

या वेळी श्री. केसरकर यांनी उपस्थितांना शांत करण्याचा प्रयत्न केला. संबंधितांनी काही गोष्टी मान्य केल्या आहेत. यामुळे तीन वर्षांनंतर तो मृतदेह काढण्यात येणार आहे. पुन्हा तसा प्रकार त्या ठिकाणी होणार नाही. यामुळे शांतता आणि सलोखा बिघडू नये यासाठी एक पाऊल मागे येण्यास हरकत नाही. शहराला शांत आणि संस्कृती असलेल्या लोकांचा वारसा लाभला आहे. यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन या वेळी त्यांनी केले. विरोध कायम राहिल्यास हा मुद्दा न्यायालयीन बाब होणार आहे. त्यानंतर आपण काहीच करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. 

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मुद्दा पटवून देण्यासाठी प्रयत्न केले. यात मुख्याधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर त्या ठिकाणचा मृतदेह हलविणे संबंधितांवर बंधनकारक राहणार आहे, परंतु त्या धर्मीयांच्या भावनेचा विचार करून आपण यातून सुवर्णमध्य काढू, असे त्यांनी सांगितले; 

मात्र या चर्चेत पालकमंत्र्यांनी मांडलेली भूमिका पटलेली नाही. यामुळे यापुढे आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे. भरवस्तीत मृतदेहाचे दफन झाले आहे. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे याबाबत योग्य तो निर्णय प्रशासन आणि पालकमंत्र्यांनी घ्यावा, असे आवाहन श्री. ओटवणेकर यांनी केले. 
या वेळी आनंद नेवगी, कीर्ती बोंद्रे, शुभांगी सुकी, परिमल नाईक, सुरेंद्र बांदेकर यांच्यासह सर्व रहिवासी उपस्थित होते. 

हे मला पटलेले 
नाही : साळगावकर 
याबाबत त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नगराध्यक्ष साळगावकर यांनी व्यासपीठावरून उठून नागरिकांत उभे राहून आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, ""मी गेली अनेक वर्षे नगराध्यक्ष आहे. मला ख्रिश्‍चन समाजाविषयी आदर आहे. शालेय जीवनात असताना पहिले रक्तदान मी ख्रिश्‍चन धर्मीयांसाठी केले होते. निवडणूक काळात रेमी आल्मेडा हा माझा बूथप्रमुख होता, तर दुसरीकडे जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांना निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न केले, असे असताना केवळ एका व्यक्तीकडून सर्व समाजाला वेठीस धरणे योग्य नाही. एका व्यक्तीकडून हिंदू आणि ख्रिश्‍चन यांच्यात दुरावा वाढविण्याचे काम गेली दोन वर्षे सुरू आहे. मिलाग्रीस मराठी प्री प्रायमरी स्कूल हे नाव बदलण्याचा घाट घातला आणि मिलाग्रीस प्री प्रायमरी स्कूल असे नाव केले. शिक्षक बदली प्रकरणातही भूमिका वादग्रस्त ठरली. यामुळे त्या ठिकाणी नागरिकांकडून आंदोलन पुकारण्यात आले. हा सर्व प्रकार मी दुर्लक्षित केला; मात्र त्यानंतर घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी होता. तो म्हणजे ख्रिश्‍चन धर्मासह सर्व धर्मीयांचा आदर असलेले ऐतिहासिक जुने चर्च कोणालाही न विश्‍वासात घेता पाडण्यात आले. अचानक हा प्रकार घडल्यानंतर पालकमंत्र्यांनी खुद्द प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना त्या ठिकाणी पाठविले आणि काम थांबविण्याचे आदेश दिले. या वेळी पालिकेकडून चर्च पाडण्याचे आदेश दिले आहेत, असे खोटे सांगण्यात आले. यानंतर हा प्रकार घडला. त्यामुळे या प्रकाराची पालकमंत्री आणि प्रशासनाने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. एकतर हा दोन धर्मांमधील विषय असल्यामुळे समोरासमोर घेऊन दोन्ही गटाचे बोलणे ऐकून घेतल्यानंतर निर्णय घेणे अपेक्षित होते; मात्र एक बाजूची भेट घेऊन त्या ठिकाणी निर्णय घेणे मला पटलेले नाही. नवसरणीत आयोजित बैठकीत दीडशे ते दोनशे लोकांना बोलावून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यामुळे शहराच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर आहे.'' 

माझा काहीही संबंध नाही : फादर लोबो 
नवसरणीत आयोजित बैठक संपल्यानंतर फादर फेलीक्‍स लोबो यांनी वृत्तपत्र प्रतिनिधीशी संपर्क साधला. झालेल्या प्रकाराबाबत आपला कोणताही संबंध नाही. ज्या दिवशी मृतदेह दफन करण्याची घटना घडली. त्या दिवशी आपण तिकडे नव्हतो. जुन्या चर्चची इमारत समाजातील लोकांनी एकत्र येऊन पाडली आहे. यामुळे या दोन्ही घटनेशी माझा काहीही संबंध नाही. नाहक काही वृत्तपत्रांमध्ये माझे नाव घालण्यात आले; मात्र त्या दिवशी मी सावंतवाडीतही उपस्थित नव्हतो. दफनविधी झाला, त्या वेळी मी या ठिकाणी नव्हतो. त्याचवेळी गोव्यातील एका जवळच्या मित्राचे निधन झाल्याने त्या ठिकाणी गेलो होतो. या सर्व प्रक्रियेत माझा कोणताही थेट संबंध नाही. त्यामुळे यात मी प्रतिक्रिया देणे टाळले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com