कॅशलेसमुळे नोटाबंदीचा तडाखा कमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

चिपळूण - नाताळच्या सुटीचा आनंद लुटण्यासाठी राज्यातील पर्यटकांनी गुहागर आणि दापोलीला पसंती दिली आहे. त्यात विदेशी पर्यटकांची भर पडली आहे. थर्टी फर्स्टपर्यंत पर्यटकांची गर्दी कायम राहणार असल्यामुळे चिपळूण, दापोली आणि गुहागरच्या अर्थकारणाला चालना मिळणार आहे. हॉटेल व्यावसायिक आणि पेट्रोल पंपावर स्वाइप मशीन उपलब्ध असल्यामुळे नोटाबंदीच्या निर्णयाचा पर्यटन हंगामावर फारसा परिणाम झाला नाही.

चिपळूण - नाताळच्या सुटीचा आनंद लुटण्यासाठी राज्यातील पर्यटकांनी गुहागर आणि दापोलीला पसंती दिली आहे. त्यात विदेशी पर्यटकांची भर पडली आहे. थर्टी फर्स्टपर्यंत पर्यटकांची गर्दी कायम राहणार असल्यामुळे चिपळूण, दापोली आणि गुहागरच्या अर्थकारणाला चालना मिळणार आहे. हॉटेल व्यावसायिक आणि पेट्रोल पंपावर स्वाइप मशीन उपलब्ध असल्यामुळे नोटाबंदीच्या निर्णयाचा पर्यटन हंगामावर फारसा परिणाम झाला नाही.

उत्कृष्ट प्रकारचे जेवण, ताजी मासळी, विपुल निसर्गसंपदा आणि गडकिल्ल्यांसाठी गुहागर, दापोली प्रसिद्ध आहे. समुद्रात पोहण्याचा आनंद लुटण्याची हौस असलेले राज्यातील पर्यटक सुटीचा आनंद लुटण्यासाठी येथे येतात. हॉटेल, लॉज आणि घरगुती जेवणाची सोय करणाऱ्या स्थानिकांना यानिमित्ताने उत्तम व्यवसाय मिळतो. खरेदीसाठी पर्यटक बाहेर पडल्यानंतर बाजारपेठेत गर्दी होते. गुहागर परिसरात नारळी, पोफळीच्या बागांमध्ये राहण्याची घरगुती सोय उपलब्ध असल्याने पर्यटक गुहागरकडे जास्त आकर्षित होत आहेत. काही दिवसांपूर्वी रशिया येथील विदेशी पर्यटकांनी गुहागरच्या समुद्रकिनाऱ्याला भेट दिली. थर्टी फर्स्टनिमित्त होणाऱ्या पार्ट्या आणि सांस्कृतिक कार्यक्रम पूर्वी सभागृहात होत होते; मात्र आयोजकांनी नारळी-पोफळीच्या बागांमध्ये असे कार्यक्रम घेण्यास सुरवात केल्यापासून पर्यटकही तेथेही आकर्षित झाले आहेत. हर्णैकिनारी भरलेला मासळी बाजार पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. धार्मिक स्थळांना भेटी देणे, आंबा, काजू, कोकण, करवंदे आणि कोकणी फळांवर प्रक्रिया केलेले पदार्थ खरेदी करण्याकडे पर्यटकांचा कल आहे. मंडणगड, दापोली, खेड आणि गुहागर भागात भटकंती करणारा पर्यटक मुक्कामासाठी चिपळूणला सर्वाधिक पसंती देत आहे.

कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य
उत्तर रत्नागिरी भागातील बहुतांशी पेट्रोल पंप आणि हॉटेल व्यावसायिकांनी स्वाइप मशीनची व्यवस्था केली आहे. शहरी भागातून येणाऱ्या पर्यटकांकडे डेबिट, क्रेडिट कार्ड उपलब्ध असल्यामुळे हॉटेल आणि पेट्रोल पंपावरील व्यवहार कॅशलेस होत आहेत.

24 डिसेंबरपासून पर्यटन हंगाम वाढला आहे. देश-विदेशातील पर्यटकांची समुद्रकिनारी असलेल्या शहरांमध्ये गर्दी वाढली आहे. स्वाइप मशीन उपलब्ध केल्यामुळे नोटाबंदीचा परिणाम व्यवसायावर झालेला नाही. पुण्याहून आलेल्या एका पर्यटकाचे पैसे संपले होते. एटीएम कार्ड बंद असल्यामुळे त्याने माझ्या स्वाइप मशीनचा वापर केला. त्यामुळे मी त्याला प्रवासासाठी जादा पैसे देऊ शकलो.
- शामकांत खातू, हॉटेल व्यावसायिक, गुहागर

Web Title: cashless currency ban