उत्साही वातावरणात रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा

सुनील पाटकर
बुधवार, 6 जून 2018

विविध गडावरून आणलेले जल, सुवर्ण नाण्यांचा आणि दुधाने छत्रपती संभाजी राजे आणि त्यांचे पुत्र शहाजी राजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला. लाखों शिवप्रेमींसह सह्याद्री व रायगडानेही हा सोहळा अनुभवला.

महाड : डफावर थाप पडली आणि अंगावर रोमांच उभे करणारे शाहिरांचे पोवाडे राजसदरेवर दणाणले. होळीच्या माळावर नगारे झडले आणि रायगडाला जाग आली. शिवरायांच्या उत्सव मूर्तीवर सुवर्णनाणी, सप्त नद्यांचे जल व दुग्धाभिषेक करण्यात आला. खांद्यावर भगवे ध्वज घेऊन आलेल्या शिवप्रेमींचा जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष रायगडावर दुमदुमला आणि उत्साही वातावरणात रायगडावर आज शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिन सोहळा समितीतर्फे छत्रपती संभाजी राजे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडावर 345 व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा झाला.यावेळी युवराज शहाजीराजे तसेच राज्यमंत्री महादेव जानकर,फिजी देशाचे राजदूत एस.धृनील कुमार, समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, सेवानिवृत्त कोकण महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख,शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु दयानंद शिंदे, पानिपतचे रोड मराठा व लाखो शिवप्रेमी उपस्थित होते.

रायगडावरील रिमझिम पाऊस आणि कंद धुके अशा आल्हाददायी वातावरणात सकाळी कार्यक्रमाला सुरवात झाली. गडावर वाजणारे ढोल ताशे, हलगीवर खेळले जाणारे मर्दानी खेळ, गोंधळ, शाहिरी पोवाड्यांनी संपूर्ण आसमंत निनादून गेला. राजसदरेवर शाहिरी मुजरा रंगत होता यामुळे गडावर शिवकाल अवतरल्याचा भास निर्माण होत होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी वाजत गाजत राजसदर येथे आणण्यात आली. यावेळी लष्कराच्या मराठा इम्फ्रंटरीच्या जवानांना मानवंदना दिली. राजसदरेवर महाराजांच्या प्रतिमेची छत्रपती घराण्याच्या राजपुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधिवत पूजा करण्यात आली.

विविध गडावरून आणलेले जल, सुवर्ण नाण्यांचा आणि दुधाने छत्रपती संभाजी राजे आणि त्यांचे पुत्र शहाजी राजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला. लाखों शिवप्रेमींसह सह्याद्री व रायगडानेही हा सोहळा अनुभवला.

यावेळी संभाजीराजे यांनी अनेक गैरसोयी सहन करत शिवप्रेमी केवळ महारांजांच्या प्रेमापोटी गडावर येतात. रायगड संवर्धनातून अनेक कामे मार्गी लागणार असून पुढील वर्षी शिवप्रेमींची कोणताही गैरसोय होणार नाही असे सांगितले. देशाचा सध्याचा शत्रू असलेल्या प्लास्टिकला हद्दपार करा आणि प्रत्येक शिवप्रेमींनी केवळ रायगडच नव्हे तर सर्व गड स्वच्छ ठेवावे असे आवाहनदेखील केले. यानंतर विविध पारंपरिक वाद्यांच्या स्वरात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक राजसदर ते शिवसमाधीपर्यंत काढण्यात आली.

अलोट गर्दीने कोंझर घाटात वाहतूक जाम

रायगडावर शिवराज्याभिषेक कार्यक्रमाची व्याप्ती वाढत आहे यामुळे देशभरातून मोठ्या संख्येने शिवप्रेमींची संख्या वाढतच आहे. परंतु रायगडावर जाण्याकरिता असलेला एकमेव मार्ग आणि त्यातच असलेला कोंझर घाट यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होतो. आज देखील रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावून ठेवल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

वाळसुरे - कोंझर गावापासून अनेकांनी आपली वाहने रस्त्याकडेला लावून चालत जाणे पसंत केले होते. त्यातच एस.टी. महामंडळाच्या गाड्या, अग्निशमन दलाची गाडी, पिण्याच्या पाण्याची गाडी यामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, शिवप्रेमींच्या उत्साहापुढे ते ही हातावर हात धरुन बसलेले दिसत होते.

रोप वे आणि पायवाट गर्दीने फुल्ल, चेंगराचेंगरीची घटना

रायगड रोप वे गेली दोन दिवस सतत सुरु आहे. मात्र शिवप्रेमींची गर्दी पाहता त्यांचे देखील काहीच चालत नसल्याचे दिसून आले. कार्यक्रमाला आलेले मान्यवर, शासकीय अधिकारी यांना प्राधान्याने सोडणे आवश्यक असल्याने शिवप्रेमींना किमान पाच ते सहा तासांची प्रतिक्षा करावी लागली. त्यातच पायी जाणाऱ्यांची संख्यादेखील अधिक असल्याने आणि ठिकठिकाणी पायऱ्यांची दुरवस्था असल्याने शिवप्रेमींना चालणे कठीण जात होते.

यामुळे अरुंद जागी गर्दी होऊन धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. खुबलढा बुरजाजवळ असलेल्या तीव्र उतारावर चेंगराचेंगरीजन्य स्थिती निर्माण होऊन काही शिवप्रेमी जखमी झाल्याची घटना घडली.

Web Title: Celebration of Shivrajyabhishek Day ceremony at Raigad in enthusiastic atmosphere