सिंधुदुर्गात हलक्या पावसाची शक्यता

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राचा अंदाज; आंबा काढणीबाबत काळजीचा सल्ला
rain
rain

मुळदे: जिल्ह्यात येत्या आठवड्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. यामुळे आंबा काढणी दरम्यान काळजी घेण्याचा कृषी सल्ला येथील फळ संशोधन केंद्राने दिला आहे. हवामान पूर्वानुमानावर आधारित कृषी सल्ल्यात म्हटले आहे की, पुढील पाच दिवसांत तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल व किमान तापमानात काही अंशी घट होऊन ते अनुक्रमे ३३ ते ३६ व २४ ते २६ अंश सेल्सिअसवर स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आर्द्रतेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान दमट व अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्याकडून वर्तविला आहे.

दक्षिण कोकण व गोवा या हवामान उपविभागामध्ये २७ मार्च ते २ एप्रिल या कालावधी दरम्यान पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण व गोवा या हवामान उपविभागामध्ये २७ मार्च ते २ एप्रिल या कालावधी दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. या कालावधी दरम्यान सरासरी कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३०.३६ व १६.४५ अंश सेल्सिअस एवढे असले, तरी यावर्षी या कालावधी दरम्यान ते अनुक्रमे ३३.३५ व २१.८४ अंश सेल्सिअस एवढे असण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसांमध्ये २३ ते २७ मार्च या कालावधी दरम्यान हलक्या स्वरुपाच्या, तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेता काढणी केलेले पीक राहिल्यास पावसात भिजून ओलाव्यामुळे शेंगातील दाण्यांची उगवण होऊन प्रत खालावण्याची शक्यता असते. अशावेळी काढणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी ठेवावे. मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेता आंब्याची काढणी सकाळच्या वेळेत ऊन नसताना झेल्याच्या सहाय्याने देठासह चौदा आणे (८० ते ८५ टक्के) पक्वतेला लवकरात लवकर करावी.

फळमाशीच्या नियंत्रणासाठी...पावसाची शक्यता लक्षात घेता आंबा फळावर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. अशावेळी बागेमध्ये गळलेली फळे गोळा करून नष्ट करावीतआणि आंबा फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी विद्यापीठाने शिफारस केलेले फळमाशी रक्षक सापळे प्रति एकरी २ याप्रमाणात बागेमध्ये झाडाच्या खालील बाजूच्या फाद्यांवर लावावेत.

फळकुज रोखण्यासाठी

काढणी करताना किंवा काढणी पश्चात आंबा फळे पावसात भिजण्याची शक्यता आहे. तरी काढणी केलेली आंबा फळे त्वरित सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. आंबा फळे पावसात भिजल्यामुळे फळावर ''फळकुज'' या काढणीपश्चात बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. फळकुजीमुळे फळे काढल्यानंतर त्यावर तपकिरी काळ्या रंगाचे चट्टे दिसून फळे कुजतात आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यासाठी फळे काढणीनंतर लगेचच ५२ अंश सेल्सिअसच्या पाण्यात १० मिनिटे बुडवून काढावीत. अशी फळे खोक्यात भरावीत अथवा पिकण्यासाठी आडीत ठेवावीत.

भिरुड अळी नियत्रणासाठी...

भिरुडाची अळी साल पोखरून खोडात शिरते व आतील भाग खाते. अशावेळी खोडातून भुसा बाहेर पडू लागतो. भुसा दिसून आल्यास या किडीचा उपद्रव झाल्याचे समजावे. अळी साधारणपणे ५ ते ६ महिने खोडात राहून खोड आतून पोखरते. परिणामी झाड आतून पोकळ बनते व मरण्याची शक्यता असते. नियंत्रणासाठी तारेच्या हुकाने खोडातील अळ्या काढून टाकून छिद्रात १० मिली क्लोरोपायरीफॉस + ५० मिली रॉकेलचे मिश्रण पिचकारीच्या सहाय्याने ओतावे

आणि छिद्रे मातीच्या सहाय्याने बुजवून घ्यावीत.

साका होऊ न देण्यासाठी...

मेघगर्जनेसह पावसाच्या शक्यतेमुळे दुपारहुन तापमान वाढ होण्याची शक्यता आहे. अशातच भरदिवसा उन्हातच आंब्याची काढणी करून उन्हामध्येच त्याची वाहतूक केली असता आंब्यामध्ये ‘साका’ ह्या शरीरक्रियात्मक विकाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. आंब्यातील साक्याचे प्रमाण कमी करण्याकरिता शक्यतो काढणी सकाळी ऊन नसताना करावी. काढलेली फळे शक्यतो सावलीत साठवावीत किंवा त्वरित पिकविण्यासाठी आडीत टाकावीत. विक्रीसाठी आंबा बाजारात पाठवत असताना त्याची वाहतूक सायंकाळी करावी. आंबा वाहतूक भरदिवसा उन्हामध्ये वाहनांच्या टपावरून करू नये.

कडक उन्हापासून संरक्षणासाठी...

दिवसा उन्हाचा कडाका जाणवत असल्यामुळे नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांच्या खोडाची साल तडकू नये व खोडाचे कडक उन्हापासून संरक्षण होण्याकरिता कलमांच्या बुंध्याला बोर्डोपेस्ट लावावी. येत्या ५ दिवसांमध्ये कमाल व किमान तापमानात वाढ होऊन दुपारनंतर उन्हाचा वाढता कडाका लक्षात घेता नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना उन्हापासून संरक्षणासाठी शेडनेटच्या सहाय्याने सावली तयार करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com