बदलत्या हवामानातही काजू ताठ मानेने उभा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

देवरूख - हापूसच्या राजाला बदलत्या वातावरणाचा फटका बसत असताना तालुक्‍यातील काजू पिकाने मात्र या बदलांचा समर्थपणे मुकाबला केल्याचे चित्र आहे. राजा असला तरी हापूस तसा नाजूकच. त्यामानाने काजू कणखर. याचाच प्रत्यय यावर्षीही आला असून काजूचे उप्तादन समाधानकारक आहे.

सध्या बाजारपेठेत काजू बीची आवक वाढली आहे; मात्र मिळणारा भाव कायम असल्याने काजू उत्पादक शेतकरी आनंदात आहे. कोकणात दरवर्षी काजू बियांची उलाढाल वाढत असून यातून शेतकरी आपली आर्थिक उन्नती साधत असल्याचे आशादायी चित्र आहे. 

आंब्याच्या तुलनेत कमी खर्चात आणि श्रमात उत्पन्न देणारे पीक म्हणून काजूकडे पाहिले जाते. लागवडीनंतर कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणाऱ्या काजूच्या विविध जाती विकसित केल्याने काजू उत्पादनात कोकण पूर्वीपेक्षा अधिक सक्षम झाले आहे. शासनाच्या फळ लागवड योजनेतूनही असंख्य शेतकऱ्यांनी डोंगर उतारावरील मोकळ्या जागेत काजूची लागवड केली आहे. यातून केवळ ४ वर्षातच उत्पादन मिळू लागल्याने शेतकऱ्यांना उत्पन्नाचे चांगले साधन उपलब्ध झाले. 

काजूचे उत्पादन वाढत असले, तरी प्रक्रिया करणारे उद्योग जिल्ह्यात कमीच आहेत. आजही कोकणातील काजू बी परराज्यात पाठवली जाते. गेल्या काही कालावधीत काजू प्रक्रिया उद्योग बारमाही चालविण्याच्या उद्देशाने लघुउद्योजक पुढे आले आहेत. काजू प्रक्रिया उद्योगांची संख्या वाढल्यास येथील बी परराज्यात जाण्याचे प्रमाण कमी होईल. तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकेल. 

काजू बीचा दर चढाच राहिला आहे. गेल्या चार वर्षांत हा दर किलोमागे ८० रुपयांवरून १४० रुपयांवर गेला आहे. यावर्षी १४० हा दर आवक वाढूनही कायम आहे. सध्या वातावरणातील उष्मा वाढल्याने काजू बी तयार होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या आवक दुपटीपेक्षा अधिक झाली असली, तरी दर मात्र १४० वर कायम आहे.

आजही कोकणात ग्रामीण भागात काजू बीच्या बदल्यात टोस्ट, बटर घेण्याची प्रथा आहे; मात्र हा दर असाच कायम राहिल्यास शेतकऱ्यांच्या मानसिकतेत बदल होऊन त्यातून शेतकरी चार पैसे गाठीला बांधेल.  
- रवींद्र हळबे, बागायतदार, शिवने

Web Title: changing environment nuts standing erect with pride