पावसाळी अधिवेशनात चव्हाण आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

शिवसेनेत मंत्रिपद मागितले जात नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर माझा विश्‍वास आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ते माझा विचार नक्की करतील, असा मला विश्‍वास आहे. त्यातही माझा विचार झाला नाही तरी मी शिवसैनिक आहे. नाराज होणार नाही. पक्षासाठी काम करत राहीन. 
- आमदार सदानंद चव्हाण

५५ प्रश्‍न मांडले - मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेचा आयाम

चिपळूण - चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात विचारलेल्या ५५ प्रश्‍नांपैकी १२ प्रश्‍नांवर विधिमंडळात सविस्तर चर्चा झाली. जिल्ह्यातील इतर आमदारांच्या तुलनेत ही कामगिरी उजवी ठरली. राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराची चर्चा सुरू असताना आमदार सदानंद चव्हाण आक्रमक झाल्यामुळे त्याला वेगळेच परिमाण लाभले. चव्हाण यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. 

चव्हाण यांनी चिपळूणच्या अनेक ज्वलंत प्रश्‍नांवर यापूर्वी सभागृहात प्रश्‍न विचारले. यातील काही प्रश्‍न चर्चेला आले तर काहींना लेखी उत्तर पाठविण्यात आले. परंतु या अधिवेशनात थोडे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. चिपळूण शहरातील बाजार पुलाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा त्यांनी प्रश्‍न उपस्थित केला. या प्रश्‍नाचे समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सभागृहात थांबवून त्यांनी आपल्या प्रश्‍नाचे स्पष्टीकरण घेतले. ऑनलाईन औषध खरेदीवर बंदीची मागणी केली. वाशिष्ठी नदी प्रदूषित झाल्यामुळे मासेमारीवर परिणाम झाल्याचा प्रश्‍न सभागृहात मांडला. कोयना प्रकल्पग्रस्तांच्या महानिर्मिती कंपनीतील नोकरीच्या प्रश्‍नावर चर्चा घडवली. केटामाईन या घातक अमली पदार्थाची लोटे औद्योगिक वसाहतीतून होणाऱ्या तस्करीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. कामथे उपजिल्हा रुग्णालयात श्‍वानदंश लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत, मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात पेढे-परशुराम गावातील कुळांना शंभर टक्के मोबदला मिळाला पाहिजे, शहरातील गांधारेश्‍वर पुलाची दुरुस्ती आणि रक्तचंदन तस्करी अशा विविध विषयावर त्यांनी सभागृहात चर्चा घडवून आणली. 

संघटनेतील मानसन्मान आणि निर्णय प्रक्रियेतील स्थान ते आक्रमकपणे न बोलता मिळवतात. ही त्यांची खास शैली आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहेत. पूर्वी राजन साळवी आणि उदय सामंत नेहमी मंत्रिपदाच्या स्पर्धेत राहिले. चव्हाण त्याला अपवाद होते. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर राज्यमंत्री मंडळाचा विस्तार अटळ असल्यामुळे योग्य वेळी आमदार चव्हाण यांनी संधी साधली. पावसाळी अधिवेशनात सभागृह गाजवून त्यांनी पक्ष नेतृत्व आणि जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले. काही दिवसात राज्यमंत्री मंडळाचा विस्तार होणार आहे. रत्नागिरी, राजापूर मतदारसंघात नेहमी होणाऱ्या कथित भूकंपामुळे तू..तू...मै..मै.. सुरू आहे. त्याचा फायदा चव्हाण यांना मिळू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.