गणेश मूर्तिकारांना बसणार ‘जीएसटी’ची झळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

१५ टक्‍क्‍यांनी वाढ - गणेशोत्सव महागला
चिपळूण - गणेशमूर्तींच्या किमतीत यंदा किमान १५ टक्के वाढ होणार आहे. २८ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्याने माती, रंग, सजावटीच्या वस्तू या साऱ्यांचे दर वाढले. याची झळ मूर्तिकार व ग्राहकांनाही बसणार आहे.

१५ टक्‍क्‍यांनी वाढ - गणेशोत्सव महागला
चिपळूण - गणेशमूर्तींच्या किमतीत यंदा किमान १५ टक्के वाढ होणार आहे. २८ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्याने माती, रंग, सजावटीच्या वस्तू या साऱ्यांचे दर वाढले. याची झळ मूर्तिकार व ग्राहकांनाही बसणार आहे.

दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल गणरायांच्या मूर्तीतून होते. मूर्तिकारांना जीएसटीचा मोठा फटका बसणार आहे. गणेशमूर्तीच्या व्यवसायामध्ये गुंतलेल्या कारागिरांना १५ ते २५ हजारांच्या दरम्यान वेतन द्यावे लागते. त्यांच्या वेतनावरही जीएसटीचा परिणाम होणार आहे. गणेशमूर्तीच्या वाढत्या किमतीचा फटका उत्सव मंडळांना बसणार आहे. मोठ्या मूर्तीच्या किमती नक्षीकामावर अवलंबून असतात. नक्षीकाम उत्तम असेल, तर एक फुटाच्या मूर्तीला काही हजार मोजावे लागतात. शाडू, प्लास्टर ऑफ पॅरिस, प्लास्टिक पेंट, वॉटर पेंट, काथ्या यांच्या किमतीत ३० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

खेर्डी येथील मूर्तिकार किशोर पालशेतकर म्हणाले की, सध्या मूर्तीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंचा व्यवसाय ठप्प झाला आहे. वस्त्रावरील जीएसटीमुळे मूर्तीसाठीची वस्त्रे महागली. अजूनही मूर्तिकारांनी वस्त्रांची खरेदी केलेली नाही. सजावटीचे साहित्यही महागले आहे. रंगावर २८ टक्के जीएसटी आहे. हार, माळ, मुकुट, दागिने, खडे यावर जीएसटी किती याबाबत संभ्रम आहे. साहित्य विकायला तयार, परंतु दराबाबत गोंधळ आहे.

गणपतीसाठी लागणारे कच्चे साहित्य म्हणजे रंग, हार, माळ, मुकुट, वस्त्र, दागिने, खडे हे जीएसटीतून वगळल्यास त्याचा फायदा मूर्तिकार आणि ग्राहकांना होईल. मूर्तींच्या किमतीही कमी होतील, अशी सूचना सावर्डे येथील सीताराम घाग यांनी केली.

ग्राहकाला स्वस्तात मूर्ती हवी, मंडळांना हव्यात मोठ्या मूर्ती. माती, रंगावर जीएसटी लागल्याने आमच्या मूर्ती पीओपीपेक्षा महाग ठरतात. त्यामुळे व्यवसाय धोक्‍यात आला. मातीच्या मूर्तींसाठी कारागीर लागतात. पीओपीच्या मूर्ती साच्यातून होतात. त्यावरही जीएसटी आहे. पीओपीवर बंदी घालण्याचे ढोंग केले जाते. लोकांतही जागरूकता नाही. त्यामुळे पुढील काळ कठीण आहे.
- शिवाजी डाफळे, अडरे