मंगेश कदमच्या घरातून सहा किलो केटामाईन जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

चिपळूण - अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी अटक केलेल्या मंगेश दीपक कदम याच्या मोरवंडे पिंपर (ता.खेड) येथील घरावर छापा टाकून आणखी पाच किलो 880 ग्रॅम केटामाईन जप्त करण्यात आले. यामुळे दोन दिवसांत 8 कोटी 77 लाख 21 हजार रुपयांचे 10 किलो 996 ग्रॅम केटामाईन जप्त करण्यात आले आहे. मंगेश कदम हा केटामाईनच्या तस्करीमधील सूत्रधार असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

शहरातील वीरेश्‍वर तलाव परिसरात केटामाईनची देवाणघेवाण होणार असल्याची माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसानी सापळा रचून संतोष हरी कदम (वय 45) याला मुद्देमालासह ताब्यात घेतले. यातील सूत्रधार मंगेश दीपक कदम असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मोरवंडे येथील मंगेश कदम व पेठमाप येथील स्वप्नील वासुदेव खोचरे याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी मंगेशच्या घराची झडती घेतल्यानंतर माळ्यावर भाताच्या कणगीमध्ये ठेवलेले पाच किलो 880 ग्राम केटामाईन पोलिसांच्या हाती लागले. मंगेश हा लोटे येथील एका केमिकल कंपनीमध्ये कामाला होता. तेथून त्याने हे पदार्थ चोरले होते. विक्रीचे काम खोचरे आणि कदम हे दोघे करायचे असे त्यांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या शोधात पोलिस आता आहेत.