‘समृद्धी’वर मेहेरबान; ‘मुंबई-गोवा’कडे दुर्लक्ष

चिपळूण - मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.
चिपळूण - मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.

५ ऑगस्टपर्यंत दुरुस्ती कठीणच - चाकरमान्यांचे याहीवर्षी हाल

चिपळूण - मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे. ५ ऑगस्टपर्यंत रस्ते दुरुस्त होतील, असे सरकारकडून सांगण्यात आले असले, तरी दरवर्षीचा अनुभव पाहता गणेशोत्सवातही रस्ते दुरुस्त होण्याची शक्‍यता कमी आहे. चाकरमान्यांचा प्रवास याही वर्षी खड्ड्यातून होणार आहे. भाजप सरकारने समृद्धी (नागपूर-औरगांबाद-मुंबई) मार्गाकडे लक्ष दिले. मात्र मुंबई-गोवा महामार्गाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

नागपूर-औरंगाबाद-मुंबई हा समृद्धी महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी शेती उपयुक्त जमिनीच्या संपादनास शेतकऱ्यांचा विरोध आहे. अडचणींवर मात करून हजारो कोटी खर्च करून मुख्यमंत्री हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आग्रही आहेत. आघाडी सरकारच्या पंधरा वर्षाच्या काळात महामार्गाचे चौपदरीकरण झाले नाही.

भाजप सत्तेवर येताच तातडीने चौपदरीकरणाला मंजुरी मिळाली. २०१७ पर्यंत महामार्ग पूर्ण करण्याची ग्वाही भाजपने दिली होती. किरकोळ अपवाद वगळता नागरिकांनी चौपदरीकरणाला सहकार्यच केले आहे. त्यामुळे मुदतीत चौपदरीकरण पूर्ण होण्यास अडचण नव्हती. प्रत्यक्षात २०१७ निम्मे संपले, तरी भूसंपादन, शेतकऱ्यांना मोबदला देणे व पुलांची उभारणी अशी प्राथमिक कामेच सुरू आहेत. कामांना गती येण्यासाठी मंत्री साध्या आढावा बैठकाही घेत नाहीत. शासकीय अधिकाऱ्यांवर चौपदरीकरण सोडण्यात आले आहे. महामार्गावरून अवजड आणि लांब पल्ल्याच्या प्रवासी वाहतुकीसह स्थानिक रिक्षा, दुचाकीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. खड्ड्यांमुळे व वाढत्या वाहतुकीने अपघातांचा धोका वाढला आहे.

तावडेंचा दौरा कधी?
कोकणातील भाजपचे नेते विनोद तावडे यांनी आघाडी सरकार सत्तेवर असताना खड्ड्यांचे राजकारण करून मुंबई-गोवा महामार्गावर रोड शो केला होता. प्रत्येक बसस्थानकावर जाऊन प्रवासी व चाकरमान्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. भाजपच्या काळातही महामार्गाचा दर्जा सुधारलेला नाही. खड्डे पाहण्यासाठी कधी दौरे काढणार, असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.

चौपदरीकरणाचे काम दिलेल्या कंपनीला खड्डे भरण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली आहे. खड्डे बुजवण्याच्या नावाखाली करण्यात येणारे ‘खडीकाम’ वाहनचालक व पादचाऱ्यांसाठी आणखी तापदायक ठरू लागले आहे. 
- अनिल जाधव, सावर्डे, ता. चिपळूण

समृद्धी महामार्ग लवकर व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. तसा प्रयत्न मुंबई-गोवा महामार्गाच्या बाबतीत भाजपकडून होत नाही. रस्ते दुरुस्तीसाठी शासनाकडे पैसे नाही, असे भाजपचे मंत्री सांगतात. मात्र समृद्धी महामार्गासाठी हजारो कोटी तातडीने उपलब्ध करून दिले जात आहेत. हा कोकणावर अन्याय आहे.
- रामदास कदम, पर्यावरणमंत्री 

रत्नागिरी, सिंधुदुर्गपेक्षा रायगड जिल्ह्यातील वडखळ येथील रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या मार्गावरून वाळू वाहतुकीच्या अवजड गाड्या बंद कराव्यात. चौपदरीकरणाचे काम मिळालेल्या कंपन्यांनी रस्ते दुरुस्तीसाठी पोटठेकेदारांची संख्या वाढवली पाहिजे. सरकारकडे तशी मागणी केली आहे. 
- भास्कर जाधव, आमदार, गुहागर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com