व्यापाऱ्यांकडून सॉफ्टवेअर अपग्रेडेशनचे काम सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

चिपळूण - वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) १ जुलैपासून लागू झाला आहे. या नवीन करप्रणालीच्या अंमलबजावणीसाठी बाजारात मोठी लगबग दिसून येत आहे. करप्रणालीनुसार बिलिंग व इतर सुविधा देण्यासाठी शहरातील बाजारपेठ आणि व्यापाऱ्यांनी सॉफ्टवेअर अपग्रेडेशनचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे शनिवार व रविवारी बाजारपेठेतील व्यवहार काही प्रमाणात ठप्प होते. काही ठिकाणी मॅन्युअली पावत्या देऊन व्यवहार सुरू होते.

सोमवारी बंद असणारी सोन्या-चांदीची दुकाने शनिवारपासून बंद आहेत. सोन्या-चांदीवर पूर्ण एक रुपया वीस पैसे कर लागायचा. आता तो तीन रुपये झाला आहे. त्यामुळे एक तोळा सोन्यासाठी किमान सहाशे रुपये अधिक मोजावे लागणार आहे. ही झळ ग्राहकांना सहन करावी लागणार आहे. मोडीवरही तीन टक्के कर लागणार आहे. कर वाढ होऊन दोनच दिवस झाले आहेत. त्यामुळे ही महागाई जाणवली नाही. 

सोने खरेदीचा हंगाम सुरू झाल्यानंतर महागाईचा फटका बसणार आहे. तत्पूर्वी सराफ व्यापाऱ्यांनी आपले सॉफ्टवेअर अपग्रेड करून घेतले. वाहन बाजारातही दुचाकीच्या किमती कमी-जास्त होणार आहे. मात्र कोणत्या दुचाकीच्या किमती कमी होतील आणि कोणत्या दुचाकीच्या किमती वाढतील हे पुढील दोन दिवसांत स्पष्ट होईल. किराणा माल, कपड्यांचे दुकानासह होलसेलच्या दुकानांमध्ये सॉफ्टवेअर अपग्रेडेशनचे काम सुरू होते.

ब्रॅंडेड डाळी व तांदूळ महागणार आहे. एक हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे कपडे स्वस्त होणार आहेत. होलसेल व्यापारी आणि किराणा मालाच्या दुकानात मॅन्युअली बिलिंगचे काम सुरू आहे. खरेदी-विक्रीनंतर हाताने पावत्या लिहून देण्याची जुनी पद्धत बाजारात अवलंबण्यात येत आहे. बॅंका आणि पतसंस्थांमध्येही अपग्रेडेशनचा परिणाम दिसून आला.

जीएसटीच्या माध्यमातून काम सोपे झाले असले तरी ही प्रणाली अंमलात आणण्यासाठीचा त्रास एकदाच सहन करावा लागणार आहे. करप्रणाली अंमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बदललेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून नवे इन्व्हॉईस तयार झाले की पुन्हा व्यवहार सुरळीत होतील.
- अविनाश गुडेकर, सीए, चिपळूण