गणेशोत्सव काळात कडधान्याचे दर कडाडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

चिपळूण - ऐन गणेशोत्सवात कडधान्याच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात तूर डाळ, हरभरा डाळीच्या दरात किलोमागे दहा रुपयांची वाढ झाल्याने ग्राहकांना दरवाढीची झळ बसली आहे. नारळाबरोबरच खोबऱ्याच्या दरातही वाढ झाली असून भाजीपाल्याचे दर मात्र स्थिर आहेत.

चिपळूण - ऐन गणेशोत्सवात कडधान्याच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात तूर डाळ, हरभरा डाळीच्या दरात किलोमागे दहा रुपयांची वाढ झाल्याने ग्राहकांना दरवाढीची झळ बसली आहे. नारळाबरोबरच खोबऱ्याच्या दरातही वाढ झाली असून भाजीपाल्याचे दर मात्र स्थिर आहेत.

गेले वर्षभर डाळींच्या दरात घसरण होत गेली; पण गत आठवड्याच्या तुलनेत कडधान्याच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात तूर डाळ, हरभरा डाळ ऐंशी रुपयांवर पोहचली आहे. मागील आठवड्यापेक्षा किलोमागे दहा रुपयांची वाढ झाली आहे. साबुदाण्याच्या दरातही किलोमागे पाच रुपयांची वाढ झाली असून सरकी तेलही भडकले आहे. नारळाचे दर वाढत असल्याने खोबऱ्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात खोबरे शंभरवरून १४० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

गणेशोत्सवामुळे भाजीपाल्याचे दर चढे राहतील असा अंदाज होता. पण मध्यंतरी पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली. सध्या बाजारात भाज्यांची रेलचेल झाल्याने दरात चढउतार दिसत आहे. कोबी, टोमॅटोच्या दरात थोडी वाढ झाली असली तरी वांगी, ढब्बू, गवार, ओला वाटाणा, कारली, भेंडी, वरणा, वाल, प्लॉवर या प्रमुख भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. कोथिंबिरीची आवक आणि मागणी वाढली आहे. घाऊक बाजारात दहा रुपये पेंढी विकली जात आहे. गौरी पूजनामुळे मेथी, पालक, पोकळा व शेपू या भाज्यांची आवक वाढू लागली आहे. मेथी व शेपूची आवक मोठ्या प्रमाणात असून रोज मेथीची पंधरा हजार पेंढी, शेपू सात हजार पेंढी आवक होत आहे. किरकोळ बाजारात १५ रुपये जुडी दराने मेथीची विक्री सुरू आहे. कांद्याची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे दरात घसरण झाली. घाऊक बाजारात सरासरी १७ रुपयांपर्यंत कांद्याचा दर आहे.

फळांच्या आवकेत वाढ
फळ बाजारात फळांची आवक हळूहळू वाढू लागली असून मोसंबी, चिक्कू, सफरचंद, डाळिंब, सीताफळाची आवक वाढली आहे.