"मुद्रा बॅंक'द्वारे उद्योजक बना - विजय जोशी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

सिंधुदुर्गनगरी - समाजातील प्रत्येक घटकाने प्रधानमंत्री मुद्रा बॅंक योजनेचा लाभ घ्यावा आणि स्वतःच्या पायावर यशस्वी उद्योजक बनावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी केले. 

सिंधुदुर्गनगरी - समाजातील प्रत्येक घटकाने प्रधानमंत्री मुद्रा बॅंक योजनेचा लाभ घ्यावा आणि स्वतःच्या पायावर यशस्वी उद्योजक बनावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी केले. 

सामाजिक न्याय भवन येथे आज मुद्रा बॅंक समन्वय समिती व जिल्हा माहिती कार्यालय यांच्यावतीने मुद्रा बॅंक योजना मेळाव्यात श्री. जोशी बोलत होते. या वेळी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा व्यवस्थापक नंदकुमार साळसकर, शशिकांत अणावकर, जिल्हा बॅंक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक किशोर जाधव, आनंद तेंडोलकर, उद्योग केंद्राचे पी. के. गावडे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे आर. एम. वाकोडे, नंदन वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते. 

श्री. जोशी म्हणाले, ""जिल्ह्यातील प्रत्येक समाजातील तरुणांनी आपली मानसिकता बदलून आपली कला जोपासण्यासाठी कर्ज घेऊन चांगले उद्योजक बनावे. या योजनेमार्फत सवलतीच्या दराने कर्जपुरवठा करण्यात येईल, असे सांगून समाजातील कोणताही भाग दुर्लक्षित राहू नये, यासाठी सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा.'' 

या योजनेनुसार कोणत्याही प्रकारचे तारण किंवा जामीनदाराशिवाय होतकरू बेरोजगारांना कर्जपुरवठा करून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी अर्थसाहाय्य दिले जाते. या योजनेंतर्गत शिशू गटामध्ये 50 हजारपर्यंत, किशोर गटामध्ये 50 हजारपासून ते 5 लाखांपर्यंत, तर तरुण गटामध्ये 5 लाखांपासून ते 10 लाखांपर्यंत कर्ज घेता येते. 

जिल्हा बॅंक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक किशोर जाधव यांनी जिल्ह्यातील तरुणांनी पुढे येऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे सांगितले. शशिकांत अणावकर, आनंद तेंडोलकर, पी. के. गावडे, नंदकुमार साळसकर यांनीही मार्गदर्शन केले. या मेळाव्यास विविध विभागाचे अधिकारी, संघटनांचे प्रतिनिधी, तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

वजन काट्यांची पडताळणी करा.... 
निरीक्षक वैधमापनशास्त्र मालवण विभाग यांनी या विभागाचे शिबिर कार्यालय कुडाळ तालुक्‍यातील सर्व व्यापाऱ्यांकरिता कुडाळ येथे श्री. सत्यवान कांबळी यांचे घरी, नवीन एस. टी. डेपोसमोर आयोजित केले आहे. तरी सर्व व्यापाऱ्यांनी आपल्याकडील सर्व प्रकारचे इलेक्‍ट्रॉनिक काटे, मेकॅनिकल काटे, वजने-मापे इत्यादीची पडताळणी व मुद्रांकन दिनांक 30 मार्च 2017 पर्यंत करून घेण्याचे आवाहन, निरीक्षक वैद्यमापनशास्त्र मालवण यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

Web Title: Collector Vijay Joshi statement