सामुदायिक गोपालन काळाची गरज - डॉ. जोशी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

सावंतवाडी - गायीच्या दुधाचे महत्त्व पूर्वापार आहे; मात्र आज गोधन कमी होत आहे. यावर उपाय म्हणून सामुदायिक गोपालनावर भर देणे काळाची गरज बनली आहे. असे केल्यास गोधन टिकून अनेक रोगांवर रोगप्रतिबंधक म्हणून काम करणारे गायीचे दूध सहज उपलब्ध होऊ शकते, असे मत दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे माजी शिक्षण संचालक डॉ. जी. डी. जोशी यांनी येथे व्यक्त केले.

सावंतवाडी - गायीच्या दुधाचे महत्त्व पूर्वापार आहे; मात्र आज गोधन कमी होत आहे. यावर उपाय म्हणून सामुदायिक गोपालनावर भर देणे काळाची गरज बनली आहे. असे केल्यास गोधन टिकून अनेक रोगांवर रोगप्रतिबंधक म्हणून काम करणारे गायीचे दूध सहज उपलब्ध होऊ शकते, असे मत दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे माजी शिक्षण संचालक डॉ. जी. डी. जोशी यांनी येथे व्यक्त केले.

सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्‍ट ऑर्गनिक फार्मस फेडरेशन यांच्यातर्फे मॅंगो ग्रुपच्या ‘गोधनम्‌’ या देशी गायीच्या दूध केंद्राचे उद्‌घाटन डॉ. जोशी यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत फेडरेशनचे अध्यक्ष बाळासाहेब परुळेकर, महेश कुमठेकर, अभिमन्यू लोंढे, राजन आंगणे, रणजित सावंत आदी उपस्थित होते. 

डॉ. जोशी म्हणाले, ‘‘भारतातील कृषी आणि ऋषी संस्कृतीचे मूळ गोधन आहे; मात्र आज गोपालन होत नाही. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर केलेले दूध, अन्न आपल्याला खावे लागत आहे. यासाठी शाश्‍वत बदल घडविणे गरजेचे आहे. गोधनाचे महत्त्व हळूहळू समजू लागले आहे. गोधन निसर्गसमृद्ध करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. गायीच्या दुधामुळे रोगप्रतिबंधक शक्ती वाढते. त्यामध्ये असलेले ‘ओमेगा थ्री’ हे द्रव्य पौष्टिक असते. त्यामुळे बुद्धीला चालना मिळते. आज बाजारात उपलब्ध होणारे पिशवीतील दूध एकप्रकारचे विष आहे. त्यामध्ये असलेले ‘ओमेगा सिक्‍स’ हे द्रव्य अनेक आजारांना आमंत्रण देते. गायीच्या तुपाला भरपूर मागणी आहे. गरोदर महिलांना हे आरोग्यदायी आहे. अनेक रोगांवर महत्त्वपूर्ण असलेले गायीचे दूध सहज उपलब्ध होते, ते आज दुरापास्त झाले आहे. ते सहज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने उद्योजक महेश कुमठेकर यांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. मॅंगो ग्रुपचे ‘गोधनम्‌’ हे देशी गायीचे शुद्ध दूध सावंतवाडीत आता उपलब्ध होणार आहे. ही आनंदाची बाब आहे.’’ 

या वेळी बाळासाहेब परुळेकर म्हणाले, ‘‘पाश्‍चात्त्य देशातील गायीचे दूध हे आरोग्यदायी नसते. देशी गायीचे दूध औषधाची खाण आहे. त्यामुळे देशी गायीचे संवर्धन केल्यास निसर्ग वाचू शकतो.’’ फेडरेशनचे रणजित सावंत यांनी प्रास्ताविक केले.  

कोकणात सेंद्रिय खताचा कारखाना व्हावा
डॉ. जोशी म्हणाले, ‘‘देशी गायीच्या दुधात रोगप्रतिबंधक शक्ती असल्याने त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यासाठी आज देशी गायीवर परदेशात संशोधन सुरू आहे. त्यामुळे गोधन संवर्धन करणे आज काळाची गरज बनली आहे. कोकण हा सेंद्रिय खताचा मोठा कारखाना झाला पाहिजे व महाराष्ट्राची गरज भागली पाहिजे, यासाठी गोपालनावर भर देणे आवश्‍यक आहे.’’