सिंधुदुर्गात काँग्रेसचे सत्तास्पर्धेत कमबॅक

सिंधुदुर्गात काँग्रेसचे सत्तास्पर्धेत कमबॅक

सावंतवाडी - आधी पालिका आणि नंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेसने कमबॅक केल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढले आहे. काँग्रेस पर्यायाने नारायण राणे यांना राजकीय गतवैभव पुन्हा मिळविण्याच्या दृष्टीने या दोन्ही निवडणुका संजीवनी देणाऱ्या ठरणार आहेत. अर्थात याचा फायदा काँग्रेसकडून कसा उठविला जातो, यावरच पुढची गणिते अवलंबून असतील.

सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे नारायण राणे, जिल्ह्याचा विकास म्हणजे राणे आणि सर्वसामान्यांचा आवाज म्हणजे राणे, अशी एकेकाळी ओळख असलेल्या राणेंना मागच्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. यानंतर जिल्ह्याचे राज्यातील राजकीय वजन बऱ्यापैकी कमी झाले ही वस्तुस्थिती आहे. एक आक्रमक आणि कोणालाही अंगावर घेणारा नेता म्हणून राणे राज्याच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करू शकले. मात्र जिल्ह्यातील जनतेने त्यांना राजकीय दहशतवाद आणि प्रदूषणकारी प्रकल्प या दोन मुद्द्यांवर नाकारले. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष वैभव नाईक यांनी त्याचा पराभव केला आणि ते ‘जायंट किलर’ ठरले. राणेंचा पराभव झाल्यानंतर अनेकांना हसू आले; परंतु त्यापेक्षाही आसू ढाळणाऱ्या कार्यकर्ता आणि त्यांना मानणाऱ्या सर्वसामान्य माणसाची संख्या जास्त होती. यानंतर पालकमंत्री म्हणून दीपक केसरकर हे विराजमान आहेत; परंतु 

राणेंसारखी आक्रमकता त्यांच्याकडे नाही. ‘अरे ला का रे’ करण्याचा स्वभाव त्यांचा नसल्यामुळे प्रशासन ढीम्म आहे. 

दुसरीकडे केसरकर हे राज्यमंत्री आहेत; परंतु सरकारचा घटक असताना सुद्धा त्यांच्याकडे म्हणावे तसे अधिकार नाहीत. त्यामुळे त्यांचेही हात बांधलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा विकास केला, कोट्यवधी निधी आणला असा जरी केसरकरांनी दावा केला असला तरी विरोधकांच्या आरोपांना ते समाधानकारक उत्तर देऊ शकलेले नाहीत.

एकंदरीत जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आक्रमक नेत्यांची गरज आहे, हे आजपर्यंत सिद्ध झालेले आहे. राणेंनी ते वेळोवेळी दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर आपल्या समवेत असलेल्या अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घडविण्याचे त्यांच्याकडून काम करण्यात आले आहे. राणेंच्या आक्रमक स्वभावामुळे सुद्धा काही कार्यकर्ते दुखावले ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. अशा स्थितीत राणेंना मुख्यमंत्र्यांपर्यंत यश मिळाल्यानंतर त्यांचा जिल्ह्यातील जनसंपर्क तुटला आणि त्यांच्या आजूबाजूला फिरणाऱ्या त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांची जागा घेण्यास सुरवात केली. साहेब भेटणार नाहीत, साहेबांचा मूड नाही, असे सांगून अनेक वेळा त्यांना सर्वसामान्य माणसापासून दूर करण्याचे काम केले. त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग काहीसा नाराज झाला.

त्यामुळे विधानसभा निवडणुकांत राणेंना पराभव सहन करावा लागला. त्यानंतर राणेंनी बांद्य्राच्या पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा विधानसभेत एन्ट्री मारण्याचा प्रयत्न केला; परंतु त्या ठिकाणी सुद्धा त्यांना अपयश आले. त्यानंतर विधान परिषदेवर ते निवडून आले आणि राजकीय प्रवाहात कायम राहीले. या त्यांच्या जीवनातील चढ-उतारात अनेकांनी राणे पर्वाचा अस्त झाला, अशी विधाने केली होती. त्यांनीच आता मागच्या दाराने त्यांना पुन्हा सभागृहात येणे शोभत नाहीत, असे ढोल बडविण्यास सुरवात केली. एकंदरीत या सर्व परिस्थितीत सुद्धा न डगमगता श्री. राणे यांनी आपला राजकीय प्रवास सुरू ठेवला. आपण कोठे कमी पडलो, कोठे चुकलो, हे आत्मचिंतन करून पुन्हा एकदा लोकांत मिसळले आणि परिणामी नुकत्याच होऊन गेलेल्या पालिका निवडणुकीत आणि आता झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसने कमबॅक केले आहे. 

संघटना एकसंध ठेवण्यासाठी महत्त्वाचा टप्पा 
जिल्हा परिषदेतील विजयामुळे काँग्रेसचे पर्यायाने राणेंचे नवे पर्व सुरू झाले असे म्हणता येईल. कारण सततच्या पराभवाने कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले होते. यामुळे काँग्रेसमधील अनेकजण नवे पर्याय शोधत होते. आताच्या विजयाने कार्यकर्त्यांमधील मनोबल वाढले आहे. संघटना एकसंध आणि मजबूत ठेवण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा म्हणता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com