"सीईओं'वरील अविश्‍वासासाठी राजकीय खल 

"सीईओं'वरील अविश्‍वासासाठी राजकीय खल 

कणकवली - कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनी जिल्हा परिषदेतील सत्ताधारी सदस्यांची गुप्त बैठक घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव आणण्याबाबतची मोर्चेबांधणी केली, मात्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या सत्ताधाऱ्यांकडे 28 सदस्य असून, अविश्‍वास मंजुरीसाठी 34 सदस्यांची गरज आहे. या आवश्‍यक 6 सदस्यांची जुळवाजुळव कशी होणार यावरून जिल्ह्यात आता राजकीय खल सुरू झाला आहे. 

श्री. राणे कॉंग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत. ते शिवसेना किंवा भाजपमध्ये जातील अशी चर्चा गेले आठवडाभर सोशल मीडियावर सुरू आहे. यावर श्री. राणे यांनी प्रथम कुडाळमध्ये आणि नंतर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपण कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले, मात्र राजकीय भूकंप घडविण्याची क्षमता आपल्यात आहे, असे सूतोवाचही त्यांनी केले. कॉंग्रेसच्या राज्यस्तरीय नेतृत्वावर तोफ डागली. यानंतर गेले दोन दिवस ते सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. रविवारी (ता. 26) मसुरे येथे झालेल्या एका कार्यक्रमात कोकणवासीयांमुळे आपल्याला राजकीय ताकद मिळाली. सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक वादळ घोंघावतय त्या वादळाचे नाव नारायण राणे आहे. एका कोकणी माणसाची राज्याच्या राजकारणात असलेले वजन आज महाराष्ट्र अनुभवत आहे. याला कारणीभूत तुम्ही आहात, याचा अभिमान तुम्ही बाळगा, असे सांगत आपण महत्त्वाकांक्षी आहे. राजकारणात चालत राहणार असे वक्तव्य केले. 

यानंतर काल सकाळी त्यांनी जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, मात्र यात राजकीय विषय झाला नसल्याचे समजते. कॉंग्रेसने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर अविश्‍वास ठराव मांडण्याचा इशारा दिला आहे. त्याबाबत चर्चा झाली असल्याचे समजते. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिंह यांच्यावर अविश्‍वास ठराव आणण्याबाबत कणकवलीतील कॉंग्रेसच्या बैठकीत स्वतः राणे यांनी मार्गदर्शन केले. हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानायला हवे. अविश्‍वास ठरावासाठी दोन तृतीयांश म्हणजे 34 सदस्यांच्या मतांची गरज आहे, हे अर्थातच इतक्‍या मोठ्या नेतृत्वाला आणि जिल्हा परिषदेत कार्यरत अनुभवी सदस्यांना माहिती असणारच. कॉंग्रेसकडे 27 आणि राष्ट्रवादी 1 मिळून राणेंच्या गटाकडे अठ्ठावीसच सदस्य आहेत. या सभागृहात शिवसेनेचे 16 तर भाजपचे 6 सदस्य आहेत. अविश्‍वासासाठी आवश्‍यक 6 मते कुठून मिळविणार या मागचे लॉजिक पुढची राजकीय गणिते ठरविणारे म्हणता येईल. अर्थात अविश्‍वास आणणार या घोषणेनंतर भाजपचे प्रवक्ते काका कुडाळकर यांनी यासाठी 34 मतांची गरज आहे आणि कॉंग्रेसकडे तितकी ताकद उरली नाही, असे वक्तव्यही केले. एकूणच या सगळ्या अविश्‍वासाच्या चर्चेची आगामी राजकीय गणितांच्या दृष्टीने चर्चा सुरू झाली आहे. 

या गुप्त बैठकीनंतर राणेंनी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकिला त्यांनी उपस्थिती लावली. या वेळी शिवसेनेला कॉंग्रेसबरोबर भाजपनेही काऊंटर करण्याचा प्रयत्न केला. ही बैठक आटोपून दुपारी श्री. राणे दिल्लीला रवाना झाले. एकूणच राणेंचा हा दौरा राजकीय वर्तुळात गूढ निर्माण करणारा ठरला. 

अविश्‍वास का? 
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सिंह आणि जिल्हा परिषदेतील सत्ताधारी असलेले कॉंग्रेसचे सदस्य यांचे सूर याआधीही जुळले नव्हते. जिल्हा परिषदेच्या मागच्या कार्यकारिणीतील सदस्यांनीही त्यांच्या विरोधात उघड नाराजी व्यक्त केली होती. कुडाळमध्ये सध्या सुरू असलेल्या सिंधुसरस प्रदर्शनाबाबत श्री. सिंह यांनी पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेतले नसल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. याचवेळी त्यांच्या विरोधात जिल्हा परिषदेमध्ये अविश्‍वास आणण्याचा इशारा कॉंग्रेसने दिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com