गोवा बनावटीची दारू इन्सुलीत जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016

बांदा ः मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली तपासणी नाक्‍यावर पोलिसांनी आज गोवा बनावटीची दारू जप्त केली. याप्रकरणी एकाला अटक केली आहे. 22 हजार 800 रुपयांच्या दारूसह 1 लाख 50 हजार रुपये किमतीची मोटारही जप्त केली. ही कारवाई दुपारी दोनच्या सुमारास करण्यात आली. अविनाश अरविंद कुबडे (वय 31, रा. बांदा-रामनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः गोव्याहून अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती येथील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार येथील सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप गीते यांनी तपासणी नाक्‍यावरील कर्मचाऱ्यांना सतर्क केले. दुपारी दोनच्या सुमारास गोव्याहून मोटार (एमएच 07 क्‍यू 3550) आली असता पोलिस महेंद्र नारनवार यांनी तिला तपासणीसाठी थांबविले. तपासणीदरम्यान मोटारीत गोवा बनावटीच्या दारूचे 7 बॉक्‍स आढळले. पोलिसांनी वाहनचालकास गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी अटक केली.
या कारवाईत 22 हजार 800 रुपयांची दारू व 1 लाख 50 हजार रुपये किमतीच्या मोटारीसह एकूण 1 लाख 72 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नारनवार, एन. एस. गावकर, जनार्दन रेवणकर, विठोबा सावंत, मनीषा वडर, सुवर्णा परब यांनी केली. येथील पोलिसांचा इन्सुली तपासणी नाका नेहमी चर्चेत असतो. या नाक्‍यावर बऱ्याच दिवसांनंतर अशी धडक कारवाई करण्यात आल्याची चर्चा सुरू होती.