विद्यमानांनी फुकाचे श्रेय घेऊ नये : सुदेश आचरेकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

नागरी गौरव 2017 हा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचे आपण अभिनंदन करतो; मात्र 2016 मध्ये मागील बॉडीने केलेल्या अतुलनीय कामांच्या जोरावर पालिकेस हा सन्मान मिळाला आहे. त्यामुळे विद्यमानांनी फुकाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये.

मालवण - नागरी गौरव 2017 हा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचे आपण अभिनंदन करतो; मात्र 2016 मध्ये मागील बॉडीने केलेल्या अतुलनीय कामांच्या जोरावर पालिकेस हा सन्मान मिळाला आहे. त्यामुळे विद्यमानांनी फुकाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. पुरस्कार मिळविल्याची दवंडी पिटण्यापेक्षा नगराध्यक्षांनी आपण स्वतः असा पुरस्कार मिळविण्यास सक्षम आहोत का? याचे आत्मपरिक्षण करावे अशी टीका माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

पालिकेच्या उपनगराध्यक्ष दालनात पत्रकार परिषद झाली. यावेळी कॉंग्रेसचे गटनेते मंदार केणी, नगरसेवक दीपक पाटकर, पूजा करलकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.  आचरेकर म्हणाले,''येथील पालिकेस नागरी गौरव 2017 हा पुरस्कार हा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन नगराध्यक्ष अशोक तोडणकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर आदींसह सर्व सहकारी नगरसेवकांच्या सहकार्यामुळेच मिळाला आहे. या पुरस्काराचे श्रेय सर्व मालवणवासियांना जाते. त्यामुळे आपल्याला पुरस्कार मिळविण्याची दवंडी पिटणाऱ्या नगराध्यक्षांनी आपण स्वतः हा पुरस्कार मिळवू शकतो का? याचे त्यांनी आत्मपरिक्षण करायला हवे.'

नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाल्यानंतर त्यांनी गेल्या सहा महिन्यात काय केले? शहरातील विकासकामे ठप्प आहेत. भुयारी गटार योजनेचे कामही ते मार्गी लावू शकलेले नाहीत. त्यामुळेच त्यांना पाच कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची नामुष्की ओढवली आहे. नळपाणी योजनेच्या कामासाठी आवश्‍यक निधी न मिळाल्याने ही योजना एक वर्ष पुढे गेली असून भविष्यात शहरवासीयांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. पालिकेला नागरी गौरव पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तो पुरस्कार स्वीकारण्यास जाताना नगराध्यक्षांना उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांच्यासह अन्य सहकारी नगरसेवकांचा विसर पडलेला दिसतो.

Web Title: Credit issue of development work : Sudesh Acharekar