गावठी दारूचा अड्डा उद्‌ध्वस्त

गावठी दारूचा अड्डा उद्‌ध्वस्त

चिपळूण - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच तालुक्‍यातील तांबी धरणाशेजारील रावळगाव येथील गावठी दारूचा अड्डा राज्य उत्पादन शुल्क विभागाने उद्‌ध्वस्त केला. या छाप्यात सुमारे साडेपाच लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेत बुधवारी (ता. १) दुपारी रावळगाव येथे छापा टाकला. अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी हाच अड्डा उद्‌ध्वस्त केला होता.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका सुरळीत पार पडण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू धंद्याविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. रावळगाव येथे तांबी धरणाशेजारील गावठी दारूचा अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार विभागीय उपायुक्त संगीता दरेकर यांच्या आदेशानुसार जिल्हा अधीक्षक प्रदीप वळुंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन झाले. काल बुधवारी (ता. १) दुपारी उत्पादन शुल्कची जिल्हा टीम तांबी धरणाशेजारी पोचली. गुरुनाथ सहदेव हळदणकर यांच्या मालकीच्या राहत्या घरात बंद खोलीतून गावठी दारू बनवण्यासाठीचा कच्चा माल आढळला. २० किलो काळ्या गुळाच्या १९९ ढेपा असा ३९०० किलो काळा गूळ, नवसागरचे ५० किलोचे सहा बॉक्‍स जप्त केले. काळ्या गुळाचे गोडाऊन पंचासमक्ष सील करण्यात आले. त्यानंतर गावठी हातभट्टीवर छापा टाकला. त्यामध्ये ५०० लिटर क्षमतेच्या २६ प्लास्टिक टाक्‍या, २०० लिटर क्षमतेचे १२ प्लास्टिक बॅरल, भट्टीसाठीचे दोन बॉयलर, असा १५ हजारचा ऐवज, ८०० लिटर गावठी हातभट्टी, नवसागर, गूळमिश्रित रसायनासह १७५ लिटर तयार गावठी दारू जप्त केली. या प्रकरणी रावळगाव-शिंदेवाडी येथील गुरुनाथ सहदेव हळदणकर (वय ३५), गोंधळे येथील कल्याण मदन सुर्वे (३६) यांना अटक केली. मात्र, एक संशयित पळून जाण्यात यशस्वी झाला असून, त्याचा शोध सुरू आहे. अधीक्षक प्रदीप वाळूंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी विभागाचे निरीक्षक तवसाळकर, दुय्यम निरीक्षक शामराव पाटील, एच. एस. चव्हाण, एस. ए. पांचाळ, खेड विभागाचे विनोद इंजे, भरारी पथकाचे शामराव शेंडे, चिपळूणचे मेहबूब शेख, जवान श्री. दहीफळे, श्री. वसावे, मिलिंद माळी, वैभव सोनावले आदींनी कारवाईत भाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com