आठवडा बाजार उलाढालीविना

currency notes, Rupee, black money
currency notes, Rupee, black money

वैभववाडी- मध्यरात्रीपासून पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्याचा मोठा परिणाम आजच्या आठवडा बाजारावर झाला. काही अपवाद वगळता व्यापाऱ्यांनी नोटा न स्वीकारल्यामुळे खरेदीकरिता आलेल्या ग्राहकांची ताराबंळ उडाली. बॅंका बंद असल्यामुळे अनेकांना खरेदीविनाच घरी रिकामी हाती परतावे लागले; मात्र असे असले तरी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे प्रत्येक जण कौतुक करताना नाक्‍यानाक्‍यावरील चर्चेतून स्पष्ट जाणवत होते.


व्यवहारात अधिक प्रमाणात चालणाऱ्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटाची केंद्राने काल मध्यरात्रीपासून चलनातून गच्छंती केली आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र स्वागतच होत आहे. लोक आपापसात बोलतानासुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळत आहेत. परंतु या निर्णयाचे परिणाम येथील आठवडा बाजारावर मोठ्या प्रमाणात झाले.
वैभववाडी तालुक्‍याचा आठवडा बाजार बुधवारी येथे भरतो. शेकडो व्यापारी आणि हजारो ग्राहक या बाजारात येतात. परंतु नेहमीप्रमाणे आठवडा बाजाराला आलेल्या लोकांना आज अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. सवयीप्रमाणे आलेले बहुतांशी ग्राहक पाचशे, हजारांच्या नोटा घेऊन आले होते. परंतु व्यापाऱ्यांकडून खरेदीपूर्वीच ग्राहकांना पाचशे, एक हजार रुपयांची नोट स्वीकारणार नाही, असे स्पष्ट सांगण्यात येत होते. त्यामुळे ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली; तर काही लोक बॅंकेतून पैसे काढून नंतर आठवड्याचा बाजार करतात; मात्र बॅंका बंद असल्यामुळे त्यांचीही कुचंबणा झाली. काहींकडे हजार-पाचशे रुपयांच्या अनेक नोटा होत्या; मात्र त्यांची अवस्था पाकिटात अजिबात पैसे नसल्यासारखी झाली होती. लोक निर्माण झालेल्या परिस्थितीपुढे हतबल होते. काही मासळी विक्रेते, हॉटेल, किराणा मालाचे दुकानदार, मेडिकल यांनी नोटा स्वीकारल्या खऱ्या; परंतु त्यांच्यासमोर सुट्ट्या पैशांची चणचण भासू लागली. ग्राहकांकडून पाचशे आणि एक हजार रुपयांच्याच नोटा येत असल्यामुळे या व्यापाऱ्यांना शंभर, पन्नास रुपयांच्या नोटाची उणीव भासू लागली. स्थानिक व्यापाऱ्यांनी ग्राहकांना सहकार्य करण्याची भूमिका ठेवली. पाचशे, एक हजार रुपयांच्या नोटा आजचा दिवस स्वीकारत असल्याचे सांगत नोटा स्वीकारल्या. त्यामुळे काही अंशी लोकांना त्याचा फायदा झाला.


आठवड्याला पगार आदा करणाऱ्या मालकांचाही आज गोंधळ झाला. पैसे असूनही ते कामगारांना आदा करू शकत नव्हते. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चालणार नसल्याची घोषणा झाल्यानंतर आजचा पहिलाच आठवडा बाजार असल्याने एकूणच संभ्रमावस्था निर्माण झाली. पैशाअभावी लोकांचे चांगलेच हाल झाले. अनेक ग्राहकांना खरेदीविनाच रिकामी हाती परतावे लागले.
एकीकडे या निर्णयाची तात्पुरती झळ ग्राहकांना बसली असली तरी सर्वच स्तरातून या निर्णयाचे स्वागतच केले जात आहे. अनेक लोक आपापसात या निर्णयावरच चर्चा करताना दिसत होते. प्रत्येक जण या निर्णयाचे स्वागत करतानाच मोदींचे विशेष कौतुक करीत होते. काळा पैसा रोखण्यासाठी हे गरजेचे आहे. त्यामुळे हा निर्णय ऐतिहासिक असल्याची चर्चाही करताना दिसत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com