केळशी येथे ढोल-ताशांच्या तालावर धरला ताल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

दापोली - पांढरा शुभ्र झब्बा, धोतर आणि डोक्‍यावर पांढरी टोपी अशा पेहरावात गावकरी... प्रत्येकाच्या हातात पेटत्या मशाली... ढोल-ताशांच्या तालावर आबालवृद्धांनी धरलेला ताल... असे दृश्‍य गौरीपूजनादिवशी केळशी येथील काळभैरव मंदिराच्या परिसरात अनुभवायला मिळते.  

दापोली - पांढरा शुभ्र झब्बा, धोतर आणि डोक्‍यावर पांढरी टोपी अशा पेहरावात गावकरी... प्रत्येकाच्या हातात पेटत्या मशाली... ढोल-ताशांच्या तालावर आबालवृद्धांनी धरलेला ताल... असे दृश्‍य गौरीपूजनादिवशी केळशी येथील काळभैरव मंदिराच्या परिसरात अनुभवायला मिळते.  

दरवर्षी गौरीपूजनाच्या दिवशी केळशी ग्रामस्थ पांढरा झब्बा लेंगा या पेहरावात हातात पेटत्या मशाली घेऊन ग्रामदैवत श्री काळभैरवाच्या भेटीला ढोल सनईच्या तालावर नाचत मंदिरात दर्शनाला येतात. यामध्ये नवानगर, कांदेवाडी, भगत आळी, बापू आळी, बाजारपेठ, वरचा डुंग, आतगाव भाट, खालचा डुंग आदी वाड्यातील ग्रामस्थांचे पलिते नाचाचे स्वतंत्र  पथक हे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हातात पेटत्या मशाली घेऊन काळभैरव मंदिराजवळ येतात. या प्रत्येक पथकाला सुमारे दहा मिनिटांचा वेळ नाचण्यासाठी दिला जातो. पेटत्या मशाली हातात घेऊन ढोल सनईच्या तालावर नाचत असलेले ग्रामस्थ अनुभवण्यासाठी दूरदूरच्या गावातील लोक गर्दी करतात. गौरी गणपतीच्या सणात गेली दीडशे वर्ष परंपरा असलेल्या या पलिते नाचाच्या कलेत आतापर्यंत एकदाही अनुचित प्रकार घडलेला नाही. पांढरा शुभ्र झब्बा, धोतर आणि डोक्‍यावर पांढरी टोपी अशा पेहराव केलेली गावातील विविध वाड्यांतील ही मंडळी हातात पेटत्या मशाली घेऊन थिरकतात. सहसा कुठे न आढळणारा हा पलित्यांचा नाच हे केळशी गावाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. यावर्षीही गौरीचे हे वैशिष्ट्य केळशीवासीयांनी जपले. कोकणातील अशा लोककलासदृश परंपरा आणि प्रथा त्या-त्या सणांपलीकडेही राज्यभरात सर्वत्र पोचण्याची गरज आहे.

गौरी पूजनाच्या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या दिवशी सायंकाळी साडेसातच्या सुमारास केळशी गावातील ग्रामस्थ पेटत्या मशाली हातात घेऊन काळभैरवाच्या मंदिरात येतात. याठिकाणी प्रत्येक पलिते नाचाच्या पथकाला आपली कला दाखविण्यासाठी संधी दिली जाते.
- रघुनाथ रटाटे, केळशी

Web Title: dapoli news dhol tasha