पेणमध्ये मृतावस्थेत आढळलेली मुले खोपोलीतील

अनिल पाटील
बुधवार, 10 मे 2017

मंगळवारी उशीरा या दोन्ही मुलाची ओळख पटल्याने पेण पोलिसांनी हे मृतदेह खोपोलीतील काजूवाडी या गावात त्यांचा नातेवाइकांना सोपवले आहेत.

खोपोली : पेण तालुक्यातील धामणी गावाच्या बाजूला दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले होते. याबाबत संपूर्ण जिल्ह्यात खळबळ व शंका निर्माण झाली होती. पोलिसदेखील या घटनेने चक्रावून गेले होते. पोलिसांनी सखोल तपास व अधिक माहिती घेतली असता ती दोन्ही मुले खोपोलीतील काजूवाडी येथील असल्याचे स्पष्ट झाले असून, ही दोन्ही मुले येथे कशी आली व त्यांचा म्रुत्यू कसा झाला याबाबत शंका व संभ्रमाची छाया गडद झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खोपोली शहरातील काजूवाडी गावात राहणारे अतीश वाघमारे (वय 15 वर्षे), तसेच येथील भंगारवाल्याचा मुलगा मल्ली (वय 10 वर्षे) ही दोन मुले रविवारपासून खोपोली शहरातून बेपत्ता होती. त्यानंतर सोमवारी पेण पोलिसांना धामणी येथील परिसरात मृत अवस्थेत दोन मुले व या मुलांच्या सोबत एक दुचाकी वाहन मिळाले. परंतु या मुलाची पेण पोलिसांना ओळख पटली नाही.

याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच शहरात व गावातील परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर मंगळवारी उशीरा या दोन्ही मुलाची ओळख पटल्याने पेण पोलिसांनी हे मृतदेह खोपोलीतील काजूवाडी या गावात त्यांचा नातेवाइकांना सोपवले आहेत. पंरतु या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळत व्यक्त होत असून ही मुले या ठिकाणी का व कशासाठी गेली होती गेली होती. त्यांच्या मृत्यूमागील नेमकं कारण काय, तसेच हा घात, अपघात, की आत्महत्या अशा शंका निर्माण होत असून पेण व खोपोली पोलिस याबाबत तपास करीत आहेत.