आरास, मखरासह इलेक्‍ट्रिक साहित्याने दुकाने सजली

संतोष कुळकर्णी : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑगस्ट 2016

देवगड : कोकणातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या गणेश उत्सवाची धांदल आता वाढू लागली आहे. नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन झाल्यानंतर आता व्यापारी चतुर्थीच्या तयारीला लागले आहेत. आरास, मखर साहित्याच्या दुकानांसह इलेक्‍ट्रिक साहित्य विक्रेत्यांनी आपली दुकाने सजवली आहेत. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे या सणाला चांगला व्यवसाय होण्याची आशा व्यावसायिक बाळगून आहेत.
 

देवगड : कोकणातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या गणेश उत्सवाची धांदल आता वाढू लागली आहे. नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन झाल्यानंतर आता व्यापारी चतुर्थीच्या तयारीला लागले आहेत. आरास, मखर साहित्याच्या दुकानांसह इलेक्‍ट्रिक साहित्य विक्रेत्यांनी आपली दुकाने सजवली आहेत. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे या सणाला चांगला व्यवसाय होण्याची आशा व्यावसायिक बाळगून आहेत.
 

कोकणात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याची तयारी आधीपासूनच सुरू असते. सणाला गावी येण्यासाठी चाकरमान्यांचे आगाऊ नियोजन असते. अलीकडे खासगी वाहने घेऊन येण्याकडे कल वाढत आहे. काही वेळा एकाच गावातील मंडळी एकत्रित येऊन स्वतंत्र गाडी ठरवत असल्याने त्यांच्या दृष्टीनेही ते सोयीचे ठरत आहे. सध्या एसटी आगार चाकरमान्यांना आणण्याच्या नियोजनात दिसत आहे.
 

स्थानिक व्यापाऱ्यांनाही आता उत्सवाचे वेध लागले आहेत. साधारणतः रक्षाबंधन झाल्यानंतर दुकाने गणपतीच्या आरासाने सजतात. सध्या सर्वत्र याचीच लगबग सुरू आहे. शहरात मखराच्या साहित्य विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. विविध आकारातील व रंगातील मखर विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. आरासाचे साहित्य मांडून दुकाने सजवण्यात आली आहेत. रंग विक्रेत्यांकडे विविध प्रकारचे रंग उपलब्ध झाले आहेत. उत्सवाआधी घरोघरी रंगकाम करण्याची पूर्वीपासून प्रथा असून, ती आजही कायम आहे. ग्रामीण भागात घराच्या साफसफाईला सुरवात झाली आहे. मातीच्या भिंती असलेल्या ठिकाणी लाल मातीचा रंग (काव) काढली जात आहे. चिरेबंदी घरांनाही रंग काढण्याचे काम सुरू झाले आहे. सध्या रंगांच्या दुकानांत खरेदीदारांची गर्दी वाढताना दिसत आहे. उत्सव काळात भजन, आरत्यांना जोर असतो. ग्रामीण भागात भजनाची परंपरा फार जुनी आहे. त्यामुळे उत्सवाआधी मृदुंग, तबला दुरुस्ती केली जाते. सध्या बाजारपेठेत वाद्य दुरुस्ती करणाऱ्या मंडळींचीही धावपळ दिसत आहे. एकीकडे महागाईचे सावट असले, तरी दुसरीकडे आपल्या लाडक्‍या गणरायाला काहीही कमी पडू नये, यासाठी सर्वांचा कटाक्ष दिसत आहे. सणाला आवश्‍यक असणाऱ्या साहित्य खरेदीसाठीही किराणा दुकानांत गर्दी वाढत आहे. पाऊस नसल्याने व्यवसायिकांच्या दृष्टीने ते सोयीचे ठरत आहे. पाऊस नसला, तर चांगला व्यापार होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.
 

मूर्तिशाळांत लगबग 

उत्सवाचा दिवस जवळ येऊ लागल्याने मूर्तिशाळांमधील लगबग आता वाढली आहे. यंदा सुरवातीपासूनच पावसाने जोर धरल्याने मूर्ती सुकण्यामध्ये काहीसा व्यत्यय येत होता; मात्र आता पावसाने उघडीप दिल्याने रंगकामाला वेग आला आहे. पाऊस थांबल्याचा मूर्तिकारांनाही लाभ झाल्याचे चित्र आहे.