हर्णै येथे विमानतळ उभारण्याची मागणी

दूरदूरच्या पर्यटकांचा वाढेल ओघ; पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांना साकडे
Demand of airport at Harnai Aditi Tatkare dabhol
Demand of airport at Harnai Aditi Tatkare dabholsakal

दाभोळ : दापोली तालुक्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटक वाढावेत याकरिता हर्णै येथे विमानतळाची मागणी करण्यात आली आहे. पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे याबाबत निवेदन देण्यात आले आहे. लाडघर बीच पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने ही मागणी करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

दापोली तालुक्यातील हर्णैजवळील २३५ एकर शासकीय जागा विमानतळासाठी सुचवली आहे. यामध्ये २१७ एकर जागा सपाट व शासकीय गायरान म्हणून उपलब्ध आहे. यापैकी पाच टक्के जागा नियमाप्रमाणे लागवडीसाठी सोडून उर्वरित जागेत विमानतळ करण्याची मागणी या निवेदनात केली आहे. ही जागा रेवस-रेड्डी राष्ट्रीय महामार्गापासून केवळ १ किमी अंतरावर असल्याने विमानतळावरुन जाणे-येणे सोयीचे होणार आहे. या जागेपासून रत्नागिरी विमानतळ १५० किमी अंतरावर, नवी मुंबईचे विमानतळ २०० किमी अंतरावर आहे. शिवाय विमानतळासाठी सुचवलेली जागा हर्णै सुवर्णदुर्ग किल्ल्यापासून तीन किमी अंतरावर तसेच श्रीवर्धन, गुहागर, खेड व मंडणगड तालुक्यातील केवळ पन्नास किमीच्या आत असल्याने या सर्व तालुक्यांना या विमानतळाचा मोठा उपयोग होणार आहे. पत्रकार परिषदेला सचिन तोडणकर, नरेश पेडणेकर, राजेश्वर सुर्वे, अमोल नरवणकर, सुनील नरवणकर, दत्ताराम नार्वेकर आदी पर्यटन व्यावसयिक उपस्थित होते.

जैवविविधता पार्कची उभारणी

दापोली तालुक्याला निसर्गाचे मोठे वरदान लाभलेले आहे. याचा आनंद घेण्यासाठी मुंबई व पुणे येथील पर्यटक दापोली तालुक्यात येतात. या पर्यटनामुळे तालुक्याचा आर्थिक स्तर उंचावत आहे. या पर्यटकांची संख्या व पर्यटनाचे दिवस वाढविण्यासाठी शासन आणि वैयक्तिक पातळीवर प्रयत्न आवश्यक आहेत.

यामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ. पां. वा. काणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ३ भारतरत्नांसह लोकमान्य टिळक, सानेगुरुजी, रँग्लर परांजपे, सरखेल कान्होजी आंग्रे या सर्वांचे दापोली शहरात एकत्रित स्मारक उभे राहणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तारापोरवाला मत्स्यालयाच्या धर्तीवर दापोली कोकण कृषी विद्यापीठात मत्स्यालय उभारण्याची तसेच जैवविविधता पार्कची मागणीदेखील निवेदनाद्वारे केली आहे.

या उपयुक्त अन फायदेशीर बाबी

  • हर्णैजवळील २३५ एकर शासकीय जागा

  • यामध्ये २१७ एकर जागा सपाट, गायरान

  • रेवस-रेड्डी महामार्गापासून केवळ १ कि.मी.

  • सुवर्णदुर्ग किल्ल्यापासून तीन किमी

  • अनेक पर्यटनस्थळे ५० किमी परिसरात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com