देवरूख आगाराच्या कारभाराने फेऱ्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

देवरूख - राज्य परिवहन महामंडळाच्या देवरूख आगारात असलेली कर्मचाऱ्यांची कमतरता आणि संगमेश्‍वर तालुक्‍यातील ग्रामीण भागात झालेली रस्त्यांची दुर्दशा याचा फटका सध्या आगारातून सुरू असलेल्या बसफेऱ्यांच्या वेळापत्रकावर होत आहे. याचा नाहक त्रास प्रवाशांना सोसावा लागत आहे.

देवरूख - राज्य परिवहन महामंडळाच्या देवरूख आगारात असलेली कर्मचाऱ्यांची कमतरता आणि संगमेश्‍वर तालुक्‍यातील ग्रामीण भागात झालेली रस्त्यांची दुर्दशा याचा फटका सध्या आगारातून सुरू असलेल्या बसफेऱ्यांच्या वेळापत्रकावर होत आहे. याचा नाहक त्रास प्रवाशांना सोसावा लागत आहे.

देवरूख आगारातून देवरूखसह संगमेश्‍वर, माखजन आणि साखरपा या चार स्थानकांचा कारभार हाकला जातो. दिवसाकाठी हजारो प्रवासी या आगारावर अवलंबून आहेत; मात्र सध्या आगारात १९ चालक व ४५ वाहकांची पदे रिक्‍त आहेत. याचा फटका कार्यरत कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना बसत आहे. तालुक्‍यातील अनेक भागातील रस्ते खराब आहेत. त्यामुळे गाड्यांची अवस्था बिकट होत आहे. गाड्यांच्या दुरुस्तीसाठी लागणारा वेळ आणि उपलब्ध कर्मचारी यांचा ताळमेळ बसत नसल्याने आगारातील अनेक फेऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे.

आगारातून सकाळी ८.१५ ची देवरूख-बामणोली, ८.४५ ची देवरूख-मार्लेश्‍वर, ९ वा. देवरूख-कुंडी, ९.३० ची देवरूख-फणसट, ११.१५ व ११.४५ ची देवरूख-काटवलीमार्गे संगमेश्‍वर, दुपारी १.०५ व ३.४५ ची देवरूख-मार्लेश्‍वर, दुपारी ४ ची देवरूख-बामणोली, दुपारी १.३० ची देवरूख-फणसट, संध्याकाळी ५.३० ची देवरूख-ओझरे, देवरूख-हातीव, देवरूख-आंबवली, ६.३० ची देवरूख-बामणोली- खडीकोळवण-ओझरे, रात्री ७.४५ ची देवरूख-फणसट या गाड्यांच्या वेळा कागदोपत्रापेक्षा अर्धातास उशिराने बदलल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

मार्गफलक नसल्याने गोंधळ
अनेक गाड्यांना मार्गफलकच नसतात. त्यामुळे प्रवाशांचाही गोंधळ उडत आहे. देवरूख आगाराच्या या भोंगळ कारभारावर प्रवासी नाराज असून विभाग नियंत्रकांनी याची वेळीच दखल घ्यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.