प्रगतीबरोबरच शिस्त आवश्‍यक - जिल्हाधिकारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

गोंदिया - रस्ता सुरक्षेचे महत्त्व विशद करणारे प्रशिक्षण राज्यात केवळ सातारा जिल्ह्यातच देण्यात येत होते. मात्र, गोंदियासारख्या दुर्गम, नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल जिल्ह्यातदेखील हे प्रशिक्षण होत आहे, ही आनंदाची बाब आहे. भावी आयुष्यातील नागरिक हा शिस्तप्रिय झाला; तर अपघात होणार नाही. एकीकडे आपण प्रगतीचे मार्ग प्रशस्त करीत असताना सोबतच शिस्त आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.

कारंजा येथील पोलिस कवायत मैदानावर सोमवारी (ता. २६) रस्ता सुरक्षा पथक अधिकाऱ्यांच्या पॉसिंग आउट परेडचे मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षणाधिकारी राजन घरडे उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी काळे म्हणाले, जिल्ह्यातील माध्यमिक विभागाच्या निवडक शिक्षकांनी आठ दिवसांचे प्रशिक्षण घेतले. सकाळी आठ ते रात्री दहापर्यंतच्या प्रशिक्षणादरम्यान या शिक्षकांनी स्वत:मध्ये एक शिस्त निर्माण केली. अत्यंत चांगल्याप्रकारचे प्रशिक्षण या शिक्षकांनी घेतल्यामुळे जिल्ह्यासाठी त्याचा निश्‍चित उपयोग होईल.

अध्यक्षस्थानावरून बोलताना पोलिस अधीक्षक डॉ. भुजबळ म्हणाले, रस्ता सुरक्षा पथकाबाबतचे येथील शिक्षकांना मूलभूत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणातून ते अधिकारी म्हणून तयार झाले. हे प्रशिक्षण केवळ गणवेश व अधिकारी म्हणून वावरण्यापुरते मर्यादित नाही. नवीन पिढी घडविण्याचे कार्य यामधून त्यांना करावयाचे आहे. सुजान, सजग व जागरूक नागरिक घडविण्याचे काम त्यांनी करावे. अपघातविरहित कामासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या ५० शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात प्रीती भालेकर, अनिल उके, फत्तेलाल परिहार, पंकज राठोड व बालसैनिक आदित्य भगत यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. विद्यार्थिनींनी वाहतुकीच्या विविध नियमांबाबत सादरीकरण केले. माध्यमिक शाळांचे शिक्षक, विद्यार्थी, पोलिस अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक रस्ता सुरक्षा पथकाचे राज्याचे महासमादेशक अरविंद देशमुख यांनी केले. संचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले. आभार श्रीकांत पाटील यांनी मानले. 

Web Title: Development of the discipline required