देवगड : फळमाश्यांचे लोण आता घरापर्यंत

उपद्रवात वाढ; देवगड बाजारपेठेत भाजी, फळांवरही हल्ला
फळमाश्यां
फळमाश्यांsakal

देवगड : यंदा आंबा बागायतदारांना मोठ्या प्रमाणात सतावणाऱ्या फळमाशीचा (बॅक्ट्रोसेरा डॉरसॅलीस) त्रास आता बाजारातील व्यावसायिकांनाही बसू लागला आहे. फळमाशीचा एकूणच फैलाव वाढल्याने आंबा बागांपुरती मर्यादित असलेली फळमाशीची उत्पत्ती आता भाजी, फळे व्यावसायिकांनाही त्रासदायक ठरत असल्याचे चित्र आहे. काही प्रमाणात घरापर्यंतही याचे लोण पोचले असून, घरात आणलेल्या फळांचीही हानी होत असल्याचा सर्वसामान्यांचा अनुभव आहे. त्यामुळे आता फळमाशीच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना करण्याची गरज तीव्र होऊ लागली आहे.

आंबा फळांना काही भागात यंदा फळमाशीचा (बॅक्ट्रोसेरा डॉरसॅलीस) त्रास जाणवला. चालू हंगामात बागांमधील तयार फळांना फळमाशीचा प्रादुर्भाव अधिक जाणवला. पर्यायाने बागायतदारांसमोर नवे संकट उभे ठाकले होते. त्यामुळे तयार फळे खराब होण्याचे प्रमाण वाढले होते. खरं तर कीडरोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी झाडाखाली फळे नष्ट करण्याची आवश्यकता असते. अन्यथा पाऊस झाल्यावर फळे कुजून त्यातून फळमाशीची उत्पत्ती होण्यास मदत होऊ शकते. फळमाशी किंचित पिवळसर तांबुस रंगाची असून, सात मिलिमीटर लांब असते. पोटाचा शेवटचा भाग टोकदार असतो. अळी पांढरट रंगाची असून एका बाजूस निमुळती असते. तिला पाय नसतात. मादी माशी फळे पक्व होण्याच्या अवस्थेत आल्यावर सालीच्या आतमध्ये अंडी घालते. सर्वसाधारणपणे एक माशी १५० ते २०० अंडी घालते. अंडी एक ते तीन दिवसात उबतात.

अळीचा कालावधी १२ ते १४ दिवसांचा असतो. त्यानंतर अळ्या फळातून जमिनीवर पडून जमिनीत कोष तयार करतात. कोशावस्थेचा कालावधी सहा ते नऊ दिवसांचा असतो. अळी फळावरील गरावर उपजिवीका करते. सुरूवातीला ज्याठिकाणी अंडी घातलेली असतात, त्याठिकाणची जागा तांबुस दिसते. नंतर फळाचे पूर्णपणे नुकसान होते. अशामुळे यंदा आंबा बागायतदार अडचणीत आले होते. झाडावरील काढून घरात आणलेल्या फळांनाही फळमाशीचा उपद्रव होऊन त्यामुळेही काही प्रमाणात नुकसान झाले; मात्र आता केवळ आंबा बागांपुरती मर्यादित असलेल्या फळमाशीचा वावर सर्वत्र असल्याचे जाणवू लागले आहे.

बाजारपेठेत विक्रीस असलेल्या फळे, भाजीपाला यांनाही फळमाशीचा उपद्रव जाणवत आहे. बाजारात आंबा वगळता अननस, केळी, पेरू, पपई, मोसंबी, संत्री आदी फळे विक्रीस असतात; मात्र फळमाशीच्या त्रासामुळे अशी फळेही खराब होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. विक्रीस असलेल्या टॉमेटोलाही फळमाशीचा त्रास जाणवत असल्याचे सांगितले जात आहे. घरात आणलेल्या अन्य फळांवरही फळमाशाचा त्रास असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे फळे पिकल्यावर खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे.

वातावरण बदलाचा परिणाम

अलीकडे सातत्याने जाणवणारे वातावरणातील बदल किटकांच्या निर्मितीला आमंत्रण देणारे ठरत आहेत. तज्ज्ञांच्या मते पूर्वी पावसाळी हंगाम नियोजित असायचा. साधारणतः जूनपासून ऑक्टोबरपर्यंत पावसाळी हंगाम असे. मात्र, अलीकडे केव्हाही पाऊस पडत असल्याने किटकांच्या उत्पत्तीला पोषक वातावरण तयार होते. फळमाशीच्या बाबतीतही असेच होत असावे, असा निष्कर्ष समोर येत आहे. त्यामुळे वातावरणातील बदलच रोगराईला आमंत्रण देणारे ठरत असल्याचे चित्र आहे.

समस्येवरील उपाय

तापमानातील चढ-उतार फळमाशीसाठी पोषक

फळमाशीचा प्रादुर्भाव झालेली फळे नष्ट करण्याची गरज

फळमाशीच्या बंदोबस्तासाठी रक्षक सापळे वापरणे आवश्यक

दुकानातील फळांचे संरक्षण करण्यासाठी जाळी आवश्यक

प्रत्येक किटकाचा अभ्यास होणे आवश्यक

यंदा आंबा पिकावर फळमाशीचा प्रादुर्भाव जाणवला. फळमाशीच्या उत्पत्तीत वाढ होण्यास बदलते अनुकूल वातावरण कारणीभूत ठरत आहे. आंबा बागांमध्ये जाणवणारा फळमाशीचा प्रादुर्भाव घरात काढून आणलेल्या आंबा फळापर्यंत पोचला होता. घरात ठेवलेली आंबा फळे यामुळे खराब होण्याचे प्रकार घडले. बाजारातील विक्रीच्या आंब्यालाही फळमाशीचा उपद्रव जाणवला. मात्र, टॉमेटोवर असा त्रास दिसत असल्यास कीटकशास्त्रज्ञांकडून त्याचा अभ्यास करणे आवश्यक ठरेल. त्यावर जाणवणारा त्रास फळमाशीमुळेच आहे की अन्य कुठल्या भाजीपाला माशीचा आहे याचे निरीक्षण करावे लागेल. यासाठी संशोधन गरजेचे आहे.

- डॉ. विजय दामोदर, उद्यानविद्यावेत्ता, आंबा संशोधन उपकेंद्र-रामेश्‍वर

दुकानात विक्रीस ठेवलेल्या फळांना फळमाशीचा त्रास जाणवत आहे. फळे सुरक्षित ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. टॉमेटोही फळमाशीमुळे खराब होत आहेत. हिरव्या टॉमेटोवर सुई टोचल्याप्रमाणे फळमाशीचा दंश असतो. टॉमेटो पिकल्यावर ते खराब होतात. साधारणतः एका केरटमधील सुमारे पाच किलो टॉमेटो खराब निघतात. त्यामुळे नुकसान सोसावे लागते.

- संतोष भुजे, भाजी व्यावसायिक, देवगड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com