देवघर मध्यम प्रकल्प:विसर्गामुळे 9 लाखांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016

नुकसान असे
या भागातील रस्त्यांच्या मोऱ्या वाहून गेल्या आहेत. यात दोन घरे आणि बाजारपेठेतील 21 स्टॉल तसेच मोहन कोथमिरे यांच्या शेळ्यांचे 20 हजार मिळून एकूण 3 लाख 26 हजार 500 रुपये, वाघेरी येथील सतीश चौगुले याच्या बागेतील नारळ, काजू कलम, मोटर पंप वाहून गेल्याने एक लाख 14 हजार तर लोरेतील दहा शेतकऱ्यांचे चार लाख 10 हजार 80 रुपये यात सर्वाधिक बाळकृष्ण गुरव यांचे 50 हजार, तर विजय गुरव यांचे 79 हजाराचे नुकसान झाले. पावसामुळे कासार्डे नागसावंतवाडीतील तीन कुटुंबाचे 40 हजार मिळून नऊ लाखांचे नुकसान झाले आहे.

कणकवली - देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर शनिवारी धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने लाभक्षेत्रातील फोंडाघाट, लोरे आणि वाघेरी परिसरातील घरे, गोठे तसेच शेतीचे अतोनात नुकसान झाले. आतापर्यंत महसूलने केलेल्या पंचनाम्यात या परिसरात सुमारे नऊ लाखांचे नुकसान झाले आहे. अजूनही पंचनामे सुरू असून नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे.

याबाबत तालुका शिवसेनेतर्फे तहसीलदार भारतभूषण रजपूत यांची भेट घेऊन तत्काळ पंचनामे करण्यात यावेत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी तसेच धरणाचे अतिरिक्त पाणी सोडत असताना बाधित होणाऱ्या गावांना माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे तहसीलदार श्री. रजपूत यांनी सांगितले. या परिसरात दोन दिवस महसूल आणि पाटबंधारे प्रकल्पाचे अधिकारी होते. परंतु अतिरिक्त पाऊस झाल्याने शनिवारी धरणाचे दरवाजे 25 सेमीने खुले केले होते. यामुळे नदीला पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली. जिल्हाधिकारी पातळीवर याबाबत निर्णय घेऊन 12 सेंमी. दरवाजे खुले ठेवण्यात आले. मात्र रविवारी सकाळी 9 वाजता पाण्याचा अतिरिक्त विसर्ग थांबविण्यासाठी दरवाजे बंद करण्यात आल्याची माहिती तहसीलदारांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिली. दरम्यान, देवधर धरणाच्या अतिरिक्त पाण्याला सोडण्यासाठी सक्षम असे कालवे नसल्याने पाणी भातशेतीत घुसले. यामुळे फोंडाघाट परिसरात धोका निर्माण झाला होता.