संगमेश्‍वरातही भाजपला ‘बाळ’से

संदेश सप्रे
मंगळवार, 16 जानेवारी 2018

आमचे टार्गेट विधानसभा निवडणूक आहे. त्यादृष्टीने प्रदेशपातळीवरून धोरणे ठरवली जात असून त्याची अंमलबजावणी आम्ही करीत आहोत. पक्ष बळकटीकरणाला यश येत असून आगामी वर्षभरात या मतदारसंघात भाजपचे एकहाती वर्चस्व निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- प्रमोद अधटराव, तालुकाध्यक्ष, संगमेश्‍वर

देवरूख - जिल्हाध्यक्षांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत बूथप्रमुख आणि हजारो कार्यकर्त्यांना एकत्र आणत शक्‍तिप्रदर्शन करणारी भाजप आता चिपळूणसह संगमेश्‍वरातही ‘बाळ’से धरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोई ‘माने’ या ना माने, तरीही आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने चिपळूण - संगमेश्‍वरातून अनपेक्षित उमेदवारीचा धक्‍का देण्याची तयारी भाजपने सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

चिपळूण पालिकेवर भाजपची सत्ता आहे. शिवाय देवरुखातही भाजपच पुढे आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चिपळूणच्या तुलनेत संगमेश्‍वरात भाजपने वरचढ कामगिरी केली आहे. पक्षबदलाचा ट्रेंड लक्षात घेता आगामी निवडणुकांच्या दृष्टीने दोन्ही तालुक्‍यात भाजपमध्येच इनकमिंग जोरात होण्याची शक्‍यता आहे. जिल्हा परिषद - पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत वर्षभरापूर्वी भाजपने चिपळूण-संगमेश्‍वर मतदारसंघात मिळवलेली दुसऱ्या क्रमांकाची मते आगामी निवडणुकीत परिवर्तनाची नांदी ठरू शकतात. याचदृष्टीने चिपळूणचा गड ताब्यात घेण्यासाठी भाजपने एक वर्ष आधीच पाऊल पुढे टाकले आहे.

जिल्हाध्यक्षांच्या अभीष्टचिंतनाचे निमित्त करीत बूथप्रमुखांसह कार्यकर्त्यांना एकत्र आणत एकप्रकारचे शक्‍तिप्रदर्शनच आज भाजपने केले आहे. या कार्यक्रमासाठी चिपळूणची निवड करीत भाजपने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सूचक ईशारा दिला आहे. स्वाभिमानच्या ‘एंट्री’नंतर रत्नागिरी मतदारसंघाची चिंता मिटली आहे. आता संगमेश्‍वर-चिपळूणवर लक्ष केंद्रित करत इथे विधानसभेसाठी अनपेक्षित उमेदवारीचा धक्‍का देण्याचे तंत्र भाजप अवलंबणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. उत्तर रत्नागिरीत शिवसेनेत सुरू असलेली सुंदोपसंदी आणि धुमसत असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या चिपळुणातून भाजपने सुरू केलेला हा प्रयत्न आगामी निवडणुकीची रंगीत तालिम असल्याचे बोलले जात आहे.

चिपळूण विधानसभा मतदार संघावर सध्या शिवसेनेचे वर्चस्व आहे. मागीलवेळी स्वतंत्र लढत भाजपने लक्षणीय मते मिळवली मात्र ऐनवेळी जिंकण्याच्या शर्यतीत राष्ट्रवादीपेक्षा शिवसेना बरी या नात्याने सेनेचा शिवधनुष्य हाती घेण्यात आले. यातून आपल्या राजकीय ताकदीचा अंदाज आलेल्या भाजपने आता पूर्णतः स्वबळाचा नारा देत चिपळूण-संगमेश्‍वर मतदार संघ काबीज करण्याचे धोरण आखले आहे. आजच्या कार्यक्रमानिमित्ताने मतदारसंघात रांगण्या-धावण्याआधीच ‘बाळ’से धरण्याचाच प्रयत्न भाजप करीत आहे.

Web Title: devrukh konkan news bjp politics