देवरुख आगारात ३० हून अधिक फेऱ्या रद्द

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

कर्मचाऱ्यांचे काम नियमात - ‘नो रिबुक’ आंदोलन; हजारो प्रवासी पावसात तिष्ठत

देवरूख - येथील आगारातील वाहकांनी आज सकाळपासून रिबुक होण्याचे बंद केले. आधीच ढासळलेल्या देवरूख आगाराचा कारभार यामुळे ठप्प झाला. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे दिवसभरात ३० पेक्षा अधिक फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की आगारावर ओढवली. याचा फटका शेकडो प्रवाशांसह विद्यार्थ्यांना सहन करावा लागला. वरिष्ठांनीही याकडे दुर्लक्ष केल्याने हे आंदोलन चिघळण्याची शक्‍यता आहे. सहकारी कर्मचाऱ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात हे आंदोलन करण्यात आले.

१५ दिवसांपूर्वी माखजनला दोन एसटीची समोरासमोर धडक झाली. या प्रकरणी चालक दीपक गेल्ये यांच्यावर अचानक निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांना शो कॉज नोटीस देणे गरजेचे होते; परंतु त्याऐवजी तडकाफडकी कारवाई झाल्याच्या निषेधार्थ बुधवारी सकाळपासून वाहकांनी रिबुक होण्यास नकार दिला. देवरूख आगारात नियमित कार्यभारासाठी १३३ वाहकांची आवश्‍यकता आहे; मात्र १२७ वाहकच कार्यरत आहेत. त्यामुळे नियमित ३५ वाहक रिबुक होतात. त्यांच्यावर ३५ पेक्षा अधिक फेऱ्या चालतात. हे वेळापत्रक साफ कोलमडले. 

सकाळी ९ पासून संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ग्रामीण भागातील ३० पेक्षा अधिक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात प्रवाशांना चार-चार तास ताटकळावे लागले. वाहक नियमित ड्युटी करीत असले तरी त्या फेऱ्याही तासभर उशिराने सुटत आहेत. यामुळे दिवसभर देवरूख आगारातील खेळखंडोब्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. येथील आगारप्रमुख रजेवर असल्याने प्रभारींपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. वाहकांनी नियमात काम सुरू केल्याने प्रशासनासमोर पेच उभा आहे.

वस्तीच्या फेऱ्या रद्द होणार
ेदेवरूख आगारातून विविध भागात नियमित १५ पेक्षा अधिक फेऱ्या वस्तीसाठी जातात. यांचा भारही रिबुक वाहकांवर असतो. आज वाहक रिबुक होत नसल्याने या सर्व फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की देवरूख आगारावर येणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी रत्नागिरीतून कोणीच न आल्याने देवरूख आगाराचा कारभार पूर्णतः ठप्प होण्याची शक्‍यता आहे.

हे आंदोलन नसून प्रशासन ज्याप्रमाणे कर्मचाऱ्याशी नियमात वागले, तसे आम्ही कर्मचारीही नियमात काम करीत आहोत. प्रशासनाने माणुसकी दाखवली असती, तर आम्हीही विचार केला असता. यामध्ये कोणत्याही संघटनेचा हात नाही आम्ही कर्मचारी म्हणून एकमुखाने असे काम करीत आहोत.
- काशिनाथ अणेराव, कामगार नेते, देवरूख आगार