गणेश मूर्तिशाळांत मूर्तिकारांची लगबग...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

यंदाही महागाईचा फटका - बाहुबलीच्या मूर्तींना मागणी

देवरूख - यावर्षीचा गणेशोत्सव ऑगस्ट महिन्यात आहे. २५ ऑगस्टला बाप्पा घरोघरी विराजमान होणार आहेत. यासाठी मूर्तिशाळांमधून जोरदार लगबग सुरू झाली आहे. यावर्षीही महागाई वाढल्याने गणेशमूर्ती महागणार आहेत.

यंदाही महागाईचा फटका - बाहुबलीच्या मूर्तींना मागणी

देवरूख - यावर्षीचा गणेशोत्सव ऑगस्ट महिन्यात आहे. २५ ऑगस्टला बाप्पा घरोघरी विराजमान होणार आहेत. यासाठी मूर्तिशाळांमधून जोरदार लगबग सुरू झाली आहे. यावर्षीही महागाई वाढल्याने गणेशमूर्ती महागणार आहेत.

कोकणात घरोघरी गणेशमूर्ती स्थापन करण्याची प्रथा आहे. यामुळे या उत्सवाला मोठे महत्त्व आहे. मूर्तिकार अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर माती भिजवून मूर्ती कामाला प्रारंभ करतात. काहीजण गणेश विसर्जनाच्या दिवशीच पहिली मूर्ती बनवून नवीन वर्षीचे काम सुरू करतात. कोकणात प्रामुख्याने शाडूच्या मातीच्या मूर्तीच तयार केल्या जातात. ही शाडूची माती गुजरात राज्यातील भावनगर येथून मागवली जाते. भावनगरमधून पेणला ही माती आणली जाते. तेथून महाराष्ट्रभर या मातीचे वितरण होते. सध्या इंधनाच्या वाढत्या दरामुळे वाहतूक खर्च वाढला आहे. यामुळे शाडूच्या मातीच्या किमतीतही वाढ झाली आहे. गतवर्षी शाडूच्या मातीचे पोते ३०० ते ३२५ रुपये दरांना होते. यावर्षी हेच पोते ३५० ते ४०० रुपयांवर गेले आहे. 

मूर्तीवरील कोरीव काम, रंगकाम करण्यासाठी कुशल कारागिरांची आवश्‍यकता असते. कोकणातील ग्रामीण भागात सध्या कारागिरांची उणीव भासत आहे. अशा स्थितीत नियमित मजूर मिळत नसल्याने मजुरी दरात वाढ झाली आहे. याचा परिणामही गणेशमूर्ती महागण्यावर होणार आहे. पूर्वी २५० ते ३०० रुपये असलेली मजुरी आता ३५० ते ४०० च्या घरात गेली आहे. 
घरगुती गणेशमूर्ती सव्वा फुटापासून ते साडेतीन चार फुटांपर्यंत उंचीच्या बनवल्या जातात. आजकाल सोशल मीडियाचा फंडा वाढल्याने त्यावर विविध रूपी गणेशाचे दर्शन आपसूक घडते. यामुळे अशा अनोख्या मूर्ती आपल्याला हव्या असा ग्राहकांचा आग्रह असतो. परिणामी, असे साचे उपलब्ध करून त्यांना ग्राहकांच्या मनासारखी मूर्ती देण्यासाठी पुन्हा खर्च वाढतो याचाही परिणाम मूर्तींच्या दरांवर होताना दिसतो. यंदा बाहुबलीच्या रूपातील गणेशमूर्तींसाठी मोठी मागणी असल्याचे चित्रशाळांमधून पाहायला मिळत आहे. यावर्षी रंग साहित्यामध्येही महागाई आली आहे. परिणामी, मूर्तीच्या किमती वाढणे अपरिहार्यच असल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे. या सर्व कारणांमुळे यावर्षीच्या महागाईची झळ बाप्पांच्या आगमनालाही बसणार हे निश्‍चित झाले आहे.