कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

देवरूख - शासनाच्या इको फ्रेंडली गणेशोत्सवाला हातभार लावण्यासाठी येथील डी-कॅडने कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती बनविण्यास सुरुवात केली आहे. नैसर्गिक असणाऱ्या या मूर्ती पर्यावरणपूरक असून डी-कॅडच्या या उपक्रमाला परिसरासह मुंबई-पुण्यातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

देवरूख - शासनाच्या इको फ्रेंडली गणेशोत्सवाला हातभार लावण्यासाठी येथील डी-कॅडने कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती बनविण्यास सुरुवात केली आहे. नैसर्गिक असणाऱ्या या मूर्ती पर्यावरणपूरक असून डी-कॅडच्या या उपक्रमाला परिसरासह मुंबई-पुण्यातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या गणेशमूर्ती पर्यावरणाला घातक असतात. या मूर्तींसाठी वापरले जाणारे रंगही केमिकलयुक्‍त असतात. पीओपीच्या मूर्तींना पर्याय म्हणून शाडू आणि लाल मातीच्या मूर्ती बनविल्या जातात; मात्र अशा कारखान्यांचे प्रमाण नगण्य आहे. आयत्या मूर्ती विकत आणून त्या रंगकाम करून विकण्यावर मूर्तिकारांचा भर असतो. अशा काळात पर्यावरणपूरक मूर्ती मिळणे दुरापास्तच झाले आहे. शासन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरे करण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

कोकणात गणेशोत्सवाचे प्रमाण सर्वाधिक आहे. येथे घरपट हा उत्सव साजरा होतो. परिणामी मूर्तींची मागणी दरवर्षी वाढती असते. अशा स्थितीत कागदाच्या लगद्यापासून मूर्ती बनविल्या तर त्या उत्सव काळात पर्यावरणपूरक ठरतील, असे डी-कॅडतर्फे ठरविण्यात आले. यानुसार त्यांनी प्रयत्न करीत अशा मूर्ती साकारल्या आहेत. विविध आकारच्या विविध रंगीत मूर्ती सध्या भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

या मूर्ती बनवण्यासाठी १ तास, तर रंगकामासाठी २ तास लागतात. परिणामी ३ तासात सुबक मूर्ती समोर उभी राहते. यासाठी वापरले गेलेले रंगही पर्यावरणपूरक असून यात केमिकलचा अंशही नाही. सध्या येथे १ फुटापासून ७ फुटापर्यंतच्या मूर्तींचे काम सुरू आहे. या मूर्ती विसर्जन केल्यावर अवघ्या १० मिनिटांत पाण्यात विरघळतात. मूर्ती बनविण्यासाठी प्राचार्य रणजित मराठे, क्रेडारच्या भारती पित्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल ठाकूर, जितेश पवार, राहुल कळंबटे, प्रणाली जाधव, विद्या वेळवणकर, वर्षा भिडे हे मेहनत घेत आहेत.

पर्यावरणपूरक उत्सवासाठी डी-कॅडने हा कागदी लगद्यापासूनच्या मूर्तींचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. याला स्थानिक भाविकांसह मुंबई-पुण्यातील भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुढील वर्षीपासून हे प्रमाण आणखी वाढविण्यात येणार आहे. कलेतून रोजगार हे सूत्र यातून डी-कॅडने जोपासले आहे.
- प्रा. रणजित मराठे, प्राचार्य, डी-कॅड, देवरूख