जयगड-डिंगणी रेल्वेमार्गाला आणखी एक आक्षेप

जयगड-डिंगणी रेल्वेमार्गाला आणखी एक आक्षेप

सहा कि.मी. बोगदा - एक्‍झॉस्ट डावखोलमध्ये नको

देवरूख - प्रस्तावित जयगड-डिंगणी रेल्वे मार्गाचे काम वेगात सुरू करण्यात आले. डिंगणीतील ग्रामस्थांचा विरोध मावळल्यानंतर संगमेश्‍वर तालुक्‍यातील उपळे आणि डावखोलमधील ग्रामस्थांनी या मार्गावर आक्षेप घेतला आहे. याबाबतची रीतसर तक्रारी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे करण्यात आल्याने पुन्हा एकदा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग खडतर बनला आहे. 

या मार्गासाठी डिंगणीच्या पुढे उपळे महसुली गावातून डावखोलच्या पुढपर्यंत ६ किमीचा बोगदा काढण्यात येणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील हा दुसरा मोठा बोगदा ठरणार आहे. या बोगद्यासाठी लागणारा एक्‍झॉस्ट मार्ग डावखोलमध्ये काढण्यात येणार आहे. परिणामी संपूर्णतः ६ किमी परिसरातील सर्व मलिदा व सामान हे डावखोल ग्रामस्थांच्या जमिनीत टाकले जाणार आहे. त्यामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत रेल्वे वा जिंदलने ग्रामस्थांना विश्‍वासात घेतलेले नाही, असा ग्रामस्थांचा आक्षेप आहे. हा बोगदा करण्यास आमचा विरोध नाही; मात्र त्याचा बाहेर पडण्याचा पर्यायी मार्ग डावखोलमध्ये होत असेल तर आमच्या मागण्या पूर्ण करून मगच तो करून घ्यावा, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबतच्या लेखी तक्रारी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांकडे केल्या आहेत.

कोकणातील सर्वांत मोठे मालवाहू बंदर असलेल्या जयगडला कोकण रेल्वेशी जोडण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने संयुक्‍त मेरीटाईम बोर्डाद्वारे जिंदल कंपनीशी करार करीत या मार्गाच्या उभारणीला सुरवात केली. यानंतर या मार्गाचे सर्वेक्षण झाले. सर्वेक्षण करताना डिंगणी रेल्वे स्थानकाची जागा चुकीची निवडल्याचा आक्षेप घेत पुन्हा ३ जूनला पाहणीसाठी गेलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांना डिंगणीतील शेकडो ग्रामस्थांनी पळवून लावले होते.

यानंतर तातडीने प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी रेल्वे अधिकारी, जिंदलचे अधिकारी आणि ग्रामस्थांची संयुक्‍त बैठक घेत ग्रामस्थांना विश्‍वासात घेऊनच प्रकल्पाचे कामकाज करू असे आश्‍वासन दिले. यानंतर ग्रामस्थांनी या मार्गावरचा बहिष्कार मागे घेतला. त्यानंतर पुन्हा एकदा कामाला वेग आला होता.

डावखोल व उपळे ग्रामस्थांच्या या भूमिकेमुळे पुन्हा एकदा डिंगणी-जयगड मार्ग अडचणीत सापडला आहे. यावर आता जिंदल आणि रेल्वे प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com