फासकीत अडकलेला बिबट्या जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

देवरूख - साखरपा-गुरववाडीत लावलेल्या फासकीत अडकलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात आज वन विभागाला यश आले. ३ तासांच्या प्रयत्नांनंतर हा बिबट्या पिंजऱ्यात आला. बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

देवरूख - साखरपा-गुरववाडीत लावलेल्या फासकीत अडकलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात आज वन विभागाला यश आले. ३ तासांच्या प्रयत्नांनंतर हा बिबट्या पिंजऱ्यात आला. बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

गेले ३-४ महिने एका बिबट्याने साखरपावासीयांच्या नाकीदम आणला होता. गुरववाडीसह संपूर्ण परिसरात या बिबट्याची दहशत होती. गावातील अनेक शेतकऱ्यांच्या गाई, बैल यांच्यावर हल्ला करून या बिबट्याने पाळीव कुत्रे, मांजरेही फस्त करण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी सुरू होती. आज दुपारी २ च्या सुमारास रानात गुरे चरावयास गेलेल्या गुराख्यांना बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू आल्यावर सर्वांची पाचावर धारण बसली; मात्र तो एकाच ठिकाणी असल्याचे दिसताच तो अडकल्याचे समजून आले. यानंतर ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसपाटील , सरपंच यांना दिली. त्यानंतर वन विभागाला कळविण्यात आले. त्यावर अधिकारी आरेकर, कुवळेकर, पाटील, देसाई, पंचायत समिती सदस्य जया माने, बापू शिंदे, शेखर आकटे, अनिल वाघाटे, महेश पाटील, विजय पाटोळे यांच्यासह अनेक स्थानिकांनी घटनास्थळी हजेरी लावली.

बिबट्या फासकीत अडकला होता. त्याला फासकीतून सोडवून पिंजऱ्यात दवडणे अवघड होते; मात्र वन विभाग कर्मचारी आणि ग्रामस्थांनी मोठ्या धाडसाने हे काम करीत ३ तासांनी त्याला पिंजऱ्यात अडकवले. हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला होता. त्याला रात्री चांदोली अभयारण्य परिसरात मुक्त करण्यात आले.