मूकबधिर प्रशांतचा ‘भरारी’ चित्रसंग्रह

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

हातात जादुई कला - रेखाकला परीक्षेत उत्तम यश; कलाविश्वाला नवी दिशा

हातात जादुई कला - रेखाकला परीक्षेत उत्तम यश; कलाविश्वाला नवी दिशा

देवरूख - मूकबधिर असला तरी परमेश्वराने हाती उत्तम कला दिल्याने प्रशांत शंकर चौगुले याने आपल्या चित्रांमधून केवळ एक- दोन शाळांचे नव्हे, तर पूर्ण संगमेश्वर तालुक्‍याचे लक्ष वेधून घेतले आहे. लायन्स क्‍लबसारख्या सामाजिक संस्था असोत अथवा व्यापारी पैसाफंड सारख्या शैक्षणिक संस्था, त्यांनी प्रशांतमधील कलागुण हेरून त्याला या क्षेत्रात एक नवी दिशा देण्याचाच प्रयत्न केला. याचाच एक भाग म्हणून प्रशांतच्या सर्वोत्तम ५० चित्रांचा संग्रह ‘भरारी’ या नावाने व्यापारी पैसाफंड संस्थेचे अध्यक्ष रवींद्र शेट्ये यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. 

प्रशांत शंकर चौगुले हा मूळचा बेळगाव येथील. मूकबधिर असल्याने त्याचे काका जयराम चौगुले त्याला स्वतःसोबत कसबा गावात घेऊन आले. जयराम चौगुले यांचा प्लास्टर करण्याचा व्यवसाय. मात्र प्रशांतला या कामात न ओढता त्याला शाळेत घालून त्याच्या जीवनाला एक वेगळी दिशा देण्याचा चंग जयराम यांनी बांधला . कसबा येथील छत्रपती राजा संभाजी विद्यालयात शिक्षण घेत असताना येथील शिक्षक रवींद्र साठे यांनी त्याच्यातील कलागुण ओळखले. त्याला पैसाफंड इंग्लिश स्कूलमध्ये कला शिक्षण घेण्यासाठी पाठविण्याचा सल्ला दिला. जयराम चौगुलेंनीही पैसा फंडच्या कलावर्गात प्रशांतला दाखल केले. तिथे प्रशांतच्या कलाविश्वाला नवी दिशा मिळाली. प्रशालेने त्याला एलिमेंटरी या रेखाकला परीक्षेला बसविले. चित्रकलेतील सर्व विषयात स्मरणचित्र हा प्रशांतचा हातखंडा. अन्य विद्यार्थ्यांप्रमाणेच रेखाकला परीक्षा दिलेल्या प्रशांतने एलिमेंटरीत अ श्रेणी मिळवली. त्यानंतर प्रशांतने मागे बघितले नाही. यावर्षी परत पैसा फंड प्रशालेने त्याला इंटरमिजिएट या रेखाकला परीक्षेला बसवले आहे. त्याची चित्रे पाहून प्रशालेने त्याच्या चित्रांचा ‘भरारी’ नावाने चित्रसंग्रह तयार केला. 
स्वातंत्र्यदिनी चित्रसंग्रहाचे प्रकाशन रवींद्र शेट्ये यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रशांतच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. याप्रसंगी जयराम चौगुले, संस्था सदस्य किशोर पाथरे, अनिल शेट्ये, जगदीश शेट्ये, धनंजय शेट्ये, संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण, पर्यवेक्षक नेहा संसारे आदी उपस्थित होते. प्रशांतला एलिमेंटरीचे प्रमाणपत्र आणि भेटवस्तूही देण्यात आल्या.