संमिश्र प्रतिसादामुळे कल ठरविणे अवघड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

सावंतवाडी - तालुक्‍यात झालेल्या मतदान प्रक्रियेला आज सर्वच पक्षांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कोणाचा कल नेमका कोठे आहे, हे सांगणे कठीण होणार आहे. शेवटच्या टप्प्यातसुद्धा आपल्या उमेदवाराला फायदा व्हावा, यासाठी राजकीय पक्षांचे नेते ग्रामीण भागात ठाण मांडून होते. तर काही मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी दौरा करताना दिसत होते. 

सावंतवाडी - तालुक्‍यात झालेल्या मतदान प्रक्रियेला आज सर्वच पक्षांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कोणाचा कल नेमका कोठे आहे, हे सांगणे कठीण होणार आहे. शेवटच्या टप्प्यातसुद्धा आपल्या उमेदवाराला फायदा व्हावा, यासाठी राजकीय पक्षांचे नेते ग्रामीण भागात ठाण मांडून होते. तर काही मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी दौरा करताना दिसत होते. 

तालुक्‍यात मतदान प्रक्रिया आज शांततेत पार पडली. सकाळच्या सत्रापासून ग्रामीण भागातील लोकांनी आपली मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली होती. आंबेगाव, कुणकेरीमध्ये सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत सुमारे ७० टक्के मतदान झाले होते. त्यामुळे त्या ठिकाणी कार्यकर्ते उत्साहात दिसत होते. कारिवडे भागात महिलांचा पुढाकार मोठ्या प्रमाणात होता. पुरुष मतदार काही ठिकाणी तुरळक प्रमाणात दिसत होते. आंबोली, दाणोली, तळवडे आदी परिसरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत होता. 

सर्वच राजकीय पक्षांचे नेते मतदानावेळी आपल्या कार्यंकर्त्याना प्रेरित करण्यासाठी मतदान बुथवर फिरत होते. यात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह माजी आमदार राजन तेली, नगराध्यक्ष बबन साळगावकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब यांचा समावेश होता. दुपारपर्यंत कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. सर्वांत जास्त प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कोलगाव मतदारसंघात शांततेच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांची कुमक त्या ठिकाणी लावण्यात आली होती.

पोलिसांकडून तालुक्‍यात गस्त घालण्यासाठी दोन भरारी पथकांकडे जबाबदारी देण्यात आली. मतदान यंत्रे बंद पडल्याचा प्रकार काही मतदान केंद्रांवर घडला; मात्र पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. 

शिवसेना-भाजपत वाद 
विलवडे येथे काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास शिवसेनेचे सदस्य राघोजी सावंत आणि भाजपचे सदस्य संदीप गावडे यांच्यात गाडीला बाजू देण्यावरून शाब्दिक वाद झाला. या वेळी त्या ठिकाणी दाखल झालेल्या पोलिसांनी दोन्ही गटांना पोलिस ठाण्यात आणले; परंतु हे प्रकरण मिटविण्यात आले. त्यामुळे या प्रकरणी कोणावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले.

Web Title: Difficult to settle trend mixed response