जिल्ह्यात ११ हाय व्होल्टेज लढती

जिल्ह्यात ११ हाय व्होल्टेज लढती

सावर्डे - जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराचा धुरळा खाली बसला. आता लक्ष लागले आहे ते हाय व्होल्टेज लढतींकडे. वीस ते पंचवीस वर्षे एकत्र लढलेले शिवसेना, भाजप स्वतंत्रपणे लढल्याने सेना-भाजप, सेना-राष्ट्रवादी अशा ११ हाय व्होल्टेज लढती होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या ५५ गटांमधील  या ११ लढतीनी साऱ्यांचीच उत्कंठा वाढविली आहे. एकमेकांविरोधात पक्षापक्षांनी तगडे आव्हान उभे केल्याने या मिनी विधानसभेच्या लढतींमध्ये अनेक स्थानिक नेत्यांची राजकीय कारकीर्द पणाला लागली आहे.

मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकत आहे. सत्तेच्या सारीपाटासाठी जिल्ह्यात अटीतटीच्या आणि हाय व्होल्टेजच्या ११ लढती होणार आहेत. त्यामध्ये फुरूस (खेड) गटामध्ये पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे बंधू अण्णा कदम व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे मेहुणे आणि जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते अजय बिरवटकर यांच्यात काँटे की टक्कर होणार आहे. करबुडे (रत्नागिरी) गटात जिल्हा परिषद उपाध्यक्ष भाजपचे सतीश शेवडेविरोधात शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने यांच्यात लढत आहे. शिरगाव गटामध्ये शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख भाई सावंत यांच्या पत्नी स्नेहा सावंत आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या पत्नी माधवी माने यांच्यात लढत होणार आहे. कोसुंब (संगमेश्‍वर) गटात माजी आमदार सुभाष बने यांचे पुत्र रोहन बने आणि माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या पत्नी नेहा माने यांच्यात टक्कर होईल. कसबा गटात जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्या पत्नी रचना महाडिक आणि शिवसेनेतील  बंडखोर आणि जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष राजेश मुकादम यांनी दंड थोपटले आहेत. उमरोली (मंडणगड) गटात काँग्रेसच्या अस्मिता केंद्रे विरोधात राष्ट्रवादीचे बंडखोर धनराज बारस्कर यांच्यात लढत होत आहे. गवाणे (लांजा) गटात शिवसेनेच्या स्वरूपा साळवी यांच्या विरोधात काँग्रेसच्या सृष्टी रेवाळे, कोदवली (राजापूर) गटात शिवसेनेच्या सुभाष गुरव व काँग्रेसचे योगेश नकाशे यांच्यात संघर्ष आहे. सावर्डे गटात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्या भगिनी युगंधरा राजेशिर्के आणि शिवसेनेकडून विद्यमान जिल्हा परिषद सदस्य बाळकृष्ण जाधव निवडणूक लढवत आहेत. अंजनवेल (गुहागर) गटात भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव व राष्ट्रवादी सोडून भाजपवासी झालेले सुरेश सावंत यांच्यात लढत आहे. बुरोंडी (दापोली) गटात शिवसेनेचे प्रदीप राणे यांच्या विरोधात शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार स्मिता जावकर भाजपकडून रिंगणात आहेत.

प्रथमच सेना-भाजप लढत
जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी २३४ उमेदवार रिंगणात आहेत; तर पंचायत समितीच्या ११० जागासाठी ४२४ उमेदवार रिंगणात आहेत. सेना-भाजप युतीमध्ये फारकत झाल्याने ते गेल्या २५ वर्षात प्रथमच एकमेकांविरुद्ध लढत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com