जिल्हाभरात दीडशे टन कचरा संकलन

जिल्हाभरात दीडशे टन कचरा संकलन

रत्नागिरी / राजापूर -  डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आज रत्नागिरी जिल्ह्यात स्वच्छता अभियानामध्ये १०० ते १५० टन कचरा संकलित करण्यात आला. या मोहिमेत तीन हजारांहून अधिक श्री सदस्यांनी भाग घेतला. बहुतांश शासकीय कार्यालयांच्या आवाराची व परिसराची साफसफाई करण्यात आली. शासकीय अधिकाऱ्यांनीही या अभियानात भाग घेतला. डॉ. नानासाहेबांच्या जयंतीदिनी दरवर्षी भारतात ही मोहीम यशस्वीपणे राबवली येत आहे.

रत्नागिरी शहरामध्ये सकाळी ७ वाजता अभियानाला सुरवात झाली. दुपारी २ पर्यंत अभियान राबवण्यात आले. सर्व शासकीय कार्यालय परिसर, साळवी स्टॉपपासून जयस्तंभापर्यंतचा मुख्य रस्ता या परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवले. मुख्य रस्त्याच्या दुतर्फाही साफसफाई करण्यात आली. ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात आले. शिस्तबद्ध पद्धतीने अभियान राबवण्यात आले. रत्नागिरी शहरामध्ये ४३ टन कचरा व देवरूखमध्ये १० टन, राजापूरमध्ये २२ टन कचरा गोळा झाला.

स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व रायगडभूषण सचिनदादा धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने स्वच्छता अभियान राबवण्यात आले. रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय, तहसील कार्यालय, उत्पादन शुल्क, जिल्हा शासकीय रुग्णालय, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, शासकीय अध्यापक महाविद्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय, रेल्वे स्थानक या महत्त्वाच्या ठिकाणी सफाई करण्यात आली. रत्नागिरी शहरात कर्लेकरवाडी, पांढरा समुद्र, पावस, पाली, करबुडे, कोतवडे, गणपतीपुळे, सापूचेतळे, खंडाळा, शिरगाव, चांदेराई, नाखरे, कोळंबे, समर्थनगर, विनम्रनगर, खेडशी, निवळी या ठिकाणच्या बैठकांमधील श्री सदस्यांनी अभियानात भाग घेतला. अभियान राबवल्यानंतर नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी गांभीर्याने लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

राजापुरातही स्वच्छतेचा जागर केला. स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवकांनी केलेल्या स्वच्छतेमुळे शहर आणि परिसरासह शासकीय कार्यालयांनी मोकळा श्‍वास घेतला. सफाई अभियानात सहभागी झालेल्या आठशेहून अधिक स्वयंसेवकांच्या प्रयत्नांमुळे शहर चकाचक दिसू लागले.

अभियानामध्ये शहरातील विविध ठिकाणी सुमारे २२ टन कचरा गोळा करण्यात आला. सुमारे ४१ किमी रस्त्यांसह अन्य परिसराची साफसफाई, स्वच्छता करण्यात आली. यामध्ये जवाहर चौक ते गुजराळीमार्गे दिवटेवाडी रस्ता, जवाहर चौक ते बागकाझी मार्गे ओगलेवाडी रस्ता, जवाहर चौक ते रानतळे रस्ता, जवाहर चौक ते शिवाजीपथ रस्ता, चव्हाटा ते कोदवली नदीपात्र या परिसराने कात टाकली. स्वच्छता अभियानाच्या सांगता समारंभावेळी नगराराध्यक्ष हनिफ काझी यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. या वेळी पालिकेचे मुख्य लिपिक किशोर जाधव उपस्थित होते.

स्वच्छता अभियानाची ऐशीतैशी
स्वच्छता अभियानाचा बोलबाला होऊन सरकारी कार्यालये कचरामुक्त करण्यात आली. अधिकाऱ्यांपासून नेत्यांपर्यंत साऱ्यांच्या छब्याही कचरा काढताना झळकल्या; मात्र पुन्हा ये रे माझ्या मागल्या. सरकारी कार्यालयामध्ये जेथे यंत्रणा आहे तिथे कचऱ्याचे ढीग जमा झाले. ते पाहून श्री सदस्यही अवाक्‌ झाले. मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाल्यानंतर काही अधिकाऱ्यांनाही ओशाळल्यासारखे वाटले. एवढा कचरा जमा झाला असे कृपया नोंदवू नका, अशी विनंतीही करण्यात आली. त्यामुळे सरकारी स्वच्छता अभियानाचे बारा वाजल्याचे स्पष्ट झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com